नंदुरबार । प्रतिनिधी
वाढदिवसानिमित्त होणार अनावश्यक खर्च टाळत भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य, नंदुरबार लोकसभा मतदार संघाचे भाजपा प्रभारी तथा आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत यांनी तोच खर्च गरिबांसाठी वापरला. त्या रकमेतून सात दिवसात जिल्यातील 6 हजार 427 गरीब बांधवांचा प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना अंतर्गत विमा उतरवला. हा अभिनव उपक्रम राबवत गावीत यांनी पुन्हा समाजात नवा आदर्श निर्माण केला.
हातावर पोट असलेला समाजाचा घटक देशभर विखुरला असून हा घटक जिवाच्या सुरक्षेपेक्षा पोटापाण्यालाच अधिक महत्व देत आहे. त्यामुळे विमा करून घेण्यासाठी त्यांना अपेक्षित रक्कम उपलब्ध करता येत नाही. हाच घटक नजरेसमोर ठेवून केंद्र शासनाने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरु केली. परंतु पोटापाण्यासाठी झगळणार्या बांधवांना या योजनेची फारशी जाणीव नाही.
या योजनेचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी राजेंद्रकुमार गावीत यांनी नेहमीच विविध उपक्रम राबवले. हे उपक्रम राबवत असतानाच यंदाचा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेत त्यांनी थेट वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळत गरीब, कष्टकर्यांना अर्पण करण्याचा देखील निर्णय घेतला. त्यानुसार राजेंद्रकुमार गावीत युवक मित्र मंडळाच्या माध्यमातून संपूर्ण नंदुरबार जिल्ह्याचा सर्वे करून श्रमजीवी बांधवांची माहिती गोळा करीत त्यांचा प्रधानमंत्री विमा योजनेंतर्गत विमा उतरविला जात आहे.
कष्टकर्यांची निशुल्क सुरक्षा
लाभार्थी बांधवांना या योजनेसाठी खर्च तर करावा लागत नाहीच, परंतु त्यांना कुठेही जावे लागत नाही. बँकांचे संपूर्ण कामकाज कार्यकर्त्यांकडून करून घेतले जात आहे. त्यांना केवळ कागदपत्रांचीच पूर्तता करून द्यावी लागत आहे. यातून लाभार्थ्यांचा अपघाती मृत्यू तथा दोन अवयव निकामी झाल्याच दोन लाख तर अपघाताबद्दल एक लाखाचे सुरक्षा कवच मिळणार आहे.
लाखोंचा खर्च
या विम्यासाठी लागणार प्रतिव्यक्ती 12 रुपयाचा खर्च राजेंद्रकुमार गावीत यांच्यामार्फत दिला जात आहे. या योजनेंतर्गत सात दिवसात एकूण 6 हजार 427 गरीब बांधवांचा विमा उतरविण्यात आला असून यासाठी आजपर्यंत 1 लाख 40 हजाराचा खर्च देखील करण्यात आला आहे. तर यासाठी विविध क्षेत्रातील 200 कार्यकर्ते श्रमदान करीत आहे.
वाढदिवस साजरा करून अनावश्यक खर्च करण्यापेक्षा हीच रक्कम गरिबांसाठी सत्कारणी लावण्याचा निर्णय घेतला. ज्यामधून गरीब, कष्टकर्यांच्या जीवनाला आधार मिळेल.
– राजेंद्रकुमार गावीत, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य (महाराष्ट्र)








