नवापूर ! प्रतिनिधी
नवापूर वनक्षेत्रात मांडूळ तस्करीत गुंतलेल्या दोघांना वनविभागाने गुरुवारी अक्कलकुवा येथून अटक केली होती . या दोघांना नवापूर न्यायालयाने दोन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की, जानेवारी २०२१ मध्ये नवापूर वनक्षेत्रात मांडूळ तस्करी केल्याप्रकरणी साजिदखान गफारखान पठाण व जुनेद आमीन मकरानी दोघे रा .मकरानी फळी , अक्कलकुवा यांच्यावर कारवाई करण्यात आली होती . दरम्यान दोघेही या कारवाईनंतर फरार झाले होते . घटनेच्या सात महिन्यानंतर वनविभागाच्या पथकाने दोघांना गुरुवारी सायंकाळी सहा वाजता ताब्यात घेतले होते . दोघांना शुक्रवारी नवापूर न्यायालयात हजर करण्यात आले असता , न्यायालयाने दोन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे . दोघांनी अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी अर्जही केला होता . परंतू खंडपीठाने तो नामंजूर केला . वनविभागाने मांडूळ तस्करी प्रकरणात यापूर्वी पाच आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले होते . या दोघांमुळे ही संख्या आता सातवर गेली आहे.दोघांची कोठडीत चौकशी केली जाणार आहे . ही कारवाई मुख्य वनसंरक्षक डी.व्ही.पगार , उपवनसंरक्षक कृष्णा भवर , विभागीय अधिकारी उमेश वावरे यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक धनंजय पवार , नवापूरचे वनक्षेत्रपाल प्रा.राजेंद्र पवार , वनपाल डि.के. जाधव , युवराज भाबड , बी.एस. दराडे , मोहम्मद शेख नवापूर व नंदुरबार वनविभागातील कर्मचारी यांनी केली .