नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील फत्तेपूर शिवारातून राज्य उत्पादनच्या मुंबई येथील भरारी पथकाने विदेशी मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनासह सुमारे २९ लाखांचा मुद्देमाल जप्त करत तिघांना अटक करण्यात आली आहे. मुंबईचे पथक येवून कारवाई करत असल्याने स्थानिक राज्य उत्पादनच्या पथकाला याचा सुगावा लागू नये,याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,फत्तेपूर ता. शिवारातून विदेशी मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मुंबई येथील राज्य उत्पादनच्या पथकाला मिळाली.त्यानुसार संबंधित विभागाचे भरारी पथक मुंबई येथून फत्तेपूर शिवारात दाखल होवून सापळा रचण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार आयशर (क्र.एम.एच १९ सी.वाय ९२००)हे वाहन संशयास्पदरित्या जात असल्याचे आढळून आल्याने पथकातील कर्मचाऱ्यांनी सदरचे वाहन अडविले.यावेळी वाहनाची तपासणी केली असता त्यात मध्यप्रदेश राज्यात निर्मित व विक्रीस असलेले मात्र महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेले विदेशी मद्याचे सुमारे ३०० बॉक्स आढळून आले.पथकाने मद्याच्या खोक्यासह वाहन असा एकूण २९ लाख ५७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे.यामध्ये वाहनचालक भटेसिंग रान्या पावरा, क्लिनर वसंत नातू पाडवी व प्रकाश गणेश पावरा यांचा समावेश आहे.सदरची कारवाई मुंबई येथील महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतिलाल उमाप,उपायकुक्त सुनिल चव्हाण,संचालक उषा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संताजी लाड, मनोज चव्हाण यांच्या निर्देशानुसार दुय्यम निरीक्षक अशोक तारु यांच्यासह पथकाने केली आहे.याबाबत जवान प्रविण धवणे यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास अशोक तारु करत आहेत.मुंबईचे पथक येवून कारवाई करत असल्याने स्थानिक राज्य उत्पादनच्या पथकाला याचा सुगावा लागू नये,याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.








