नंदूरबार l प्रतिनिधी
भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांचेकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार, जिल्ह्यातील दोन दिवसानंतर किमान व कमाल तापमानात वाढ होऊन थंडी कमी होईल. पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहील आणि पुढील तीन दिवस हवेचा वेग थोड्या प्रमाणात वाढेल (९ ते १२ किमी प्रति तास) राहील तसेच किमान तापमान १५ ते १७ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान २६ ते ३० अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे.
शेतकरी बांधवांनी उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी किमान तापमान १८ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यावर करावी. रबी पिकांना त्यांच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेमध्ये गरजेनुसार पाणी द्यावे. पक्वता अवस्थेत असलेल्या तूर पिकाची काढणी व मळणी करून घ्यावी. तसेच पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कापसाचे फरदड पिक घेऊ नये असा सल्ला जिल्हा कृषि हवामान केंद्र, डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार यांनी दिला आहे.