नवापूर l प्रतिनिधी
नवापूर शहरातील विजय इलेक्ट्रॉनिक्स दुकान आणि गोडाऊनला भीषण आग लागली असून या आगीत टीव्ही, फ्रिज सह इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाले आहे. आगीचे कारण अजून गुलदस्त्यात आहे. नवापूर, नंदुरबार, सोनगड अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियत्रंन मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे.दरम्यान आग विझवण्यासाठी गेलेला अग्निशामक दलाचा एक जवान जखमी झाल्याची घटना घडली आहे.या घटनेत 70 ते 80 लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नवापूर शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या विजय इलेक्ट्रॉनिक्स दुकान व गोडाऊनला सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याने नागरिकांसह प्रशासनाची धावपळ उडाली. दुकानमालक हेमंत सोनवणे यांना आग लागल्याचे कळताच त्यांनी शंभर मीटर अंतरावर असलेल्या पोलीस स्टेशनला धाव घेतली त्यांनी अग्निशमन दलाला फोन करायला लावला असता फोन बंद येत असल्याने त्यांना प्रत्यक्ष जावे लागले. त्यानंतर चालक उपलब्ध नसल्याने अर्धा तास उशिराने अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचल्याने तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केल्याने दुकानातील लाखो रुपयांचा सामान जळून खाक झाला आहे.
आग विझवण्यासाठी नवापूर, नंदुरबार आणि गुजरात राज्यातील जवळील सोनगड येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. अग्निशामक दलाच्या वतीने आगीवर नियंत्रण मिळवले आहे, परंतु भीषण आगीत इलेक्ट्रॉनिक्स दुकानातील टीव्ही फ्रिज सह लाखो रुपयांच्या वस्तू जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नसून आगीवर नियंत्रण मिळवतांना अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाल्याची माहिती आहे. घटनास्थळी नवापूर पोलीस व स्थानिक प्रशासन दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
सदर दुकान व गोडावूनात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वस्तू असल्याने आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज प्रथमदर्शनी व्यक्त करण्यात येत आहे.








