नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्ह्यात पोलीस दलातर्फे विना मास्क सार्वजनिक ठिकाणी फिरतांना मिळुन आलेल्या ४६४ इसमांवर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे . तसेच दुकानात ५० टक्के पेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश देवुन दुकानात सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता मिळुन आलेल्या १२ व्यवसायीकांविरुध्द् व रात्री १० वाजे नंतर सुरु असलेल्या दुकानदार व इतर व्यवसायीकांविरुध्द् नंदुरबार शहर , उपनगर व शहादा पोलीस ठाणे येथे ५ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे .नागरिकांनी शासनाच्या आदेशाचे पालन न केल्यास कठोर कारवाईचे संकेत जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी दिले आहे.
दक्षिण अफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ओमायक्रॉन वेरिएंटने संपुर्ण जगभरात चिंता निर्माण केली आहे . ओमायक्रॉनचा भारतात संसर्ग झाल्यामुळे भारतात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे ही अतिशय चिंतेची बाब आहे . कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन होणे गरजेचे आहे . खबरदारी म्हणून केंद्र व राज्य सरकार युध्द् पातळीवर प्रयत्न देखील करत आहेत , त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र सरकारने विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सर्व खाजगी व सार्वजनिक ठिकाणी आता विना मास्क फिरण्यावर बंदी घातली आहे . तसेच मास्क न लावणाऱ्या व शासनाकडुन देण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन न करणाऱ्या लोकांना योग्य तो दंड वसुल करुन त्यांचेवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे आदेश दिलेले होते . कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांनी कडक निर्बंध लागू करण्याचे निर्णय प्रशासनाकडुन घेण्यात येत आहेत . कोरोना विषाणूची लढाई जनतेच्या सहकार्याने जिंकायची आहे त्यासाठी प्रत्येक नागरिकाने जागरुक राहून हा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाला काळजी घ्यावी लागणार आहे . नंदुरबार जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असतांना नंदुरबार शहर , म्हसावद , नवापुर , नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीत विना मास्क सार्वजनिक ठिकाणी फिरतांना मिळुन आलेल्या ४६४ इसमांवर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे . तसेच दुकानात ५० टक्के पेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश देवुन दुकानात सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता मिळुन आलेल्या १२ व्यवसायीकांविरुध्द् व रात्री १०.०० वाजे नंतर सुरु असलेल्या दुकानदार व इतर व्यवसायीकांविरुध्द् नंदुरबार शहर , उपनगर व शहादा पोलीस ठाणे येथे ०५ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे .
प्रत्येक व्यक्तीने कोविडच्या नियमाचे पालन करणे आवश्यक असून लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे . तसेच नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक व्यवसायीकाने आपल्या दुकान , हॉटेल , भोजनालय इत्यादी ठिकाणी ५० टक्के पेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश देऊ नये . तसेच सार्वजनिक व खाजगी ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन विना मास्क घराच्या बाहेर पडू नये . प्रत्येक समारंभाला तसेच कार्यक्रमाला प्रशासनाची परवानगी आवश्यक असून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे . सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन आढळल्यास किंवा खाजगी व सार्वजकि ठिकाणी विना मास्क आढळल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल याची जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने नोंद घ्यावी तसेच अत्यंत महत्वाचे काम असल्यास नागरीकांनी बाहेर पडावे जेणेकरून विषाणूचा संसर्ग जास्त प्रमाणात वाढणार नाही असे नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे .








