नंदुरबार | प्रतिनिधी
कोविड-१९ काळात शासकीय ड्युटी करीत असतांना कोरोनाची लागण होवुन मृत्यू झालेल्या शिक्षक कर्मचारी यांच्या कुटुंबियांना मदत मिळण्याच्या मागणीचे निवेदन प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आपली सामाजिक बांधिलकी जपत वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत कोरोना काळात खाली दिलेल्या जबाबदार्या प्रामाणिकपणे पार पाडत असतांनाजिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार व्हिडीओ कॉन्फरन्सच्या तोंडी आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील गटविकास अधिकारी यांना दिलेल्या तोंडी आदेशान्वये कोविड-१९ काळात खालीलप्रमाणे शासकीय ड्युटी करणेबाबत आदेश दिले होते. क्वारंटाईन सेंटरवर नोंदणी करणे. कोरोना बाधिताच्या संपर्कात आलेल्यांची यादी करणे.सदर यादीतील लोकांना कोरोना टेस्ट करुन घेण्यासाठी प्रवृत्त करणे. याद्यांमधील लोकांची माहिती पोर्टलवर भरणे आदी कामाव्यतिरिक्त इतरही अनेक कामे आरोग्य केंद्र, ग्रामसेवक तोंडी सुचना देवून शिक्षकांकडून करवून घेतात अन्यथा वरिष्ठांना नावे कळवु अशी भाषा वापरली जाते.
शिक्षकांनी आतापर्यंत त्यांना दिलेल्या जबाबदार्या पार पाडत असतांना आपली शाळेतील कामेही अखंडपणे चालु ठेवली आहेत. स्वाध्याय उपक्रमात नंदुरबार जिल्हा राज्यात चांगल्या स्थानी आहे. विद्यार्थ्यांना अखंडपणे अध्यापन केले आहे. कोरोनाविषयक कामांमुळे नंदुरबार जिल्ह्यातील अनेक शिक्षकांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले. शेकडो शिक्षक व त्यांचे कुटूंबिय कोरोनाबाधित झाले. त्यांना उपचार मिळण्यात प्रचंड अडचणी येत आहेत. प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतली नाही. लसीकरणासाठी देखील शिक्षकांना सर्वत्र भटकावे लागत आहे. अशा स्थितीत नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शिक्षकांमध्ये कमालीची असुरक्षितता व नाराजीची भावना आहे. कोरोना सेवेत असणार्या शिक्षकांना ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण तात्काळ देण्यात यावे. आतापर्यंत नंदुरबार जिल्ह्यात कोरोनामुळे मयत शिक्षकांच्या कुटूंबाला याचा तातडीने लाभ देण्यात यावा. कोरोना संक्रमित शिक्षकांच्या व कुटूंबातील सदस्याच्या उपचाराची हमी प्रशासनाने घ्यावी. शिक्षकांना कोरोनाविषयक कामाचे आदेश देतांना ते सक्षम अधिकार्यांच्या(आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या संदर्भसह) सहीने व किती दिवस काम करावे याचा आदेशामध्ये उल्लेख असावा. जेणेकरुन भविष्यात शिक्षकांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत. एका शिक्षकास एकच काम देण्यात यावे. कारण कामाव्यतिरिक्त शालेय काम सुद्धा पार पाडणे आवश्यक होते. परंतु तोंडी आदेशाने कामे करुन घेतली. शिक्षकांना पीपीई किट, मास्क व अन्न सुरक्षा साधने प्रशासनाकडून पुरविली जावीत. कोरोना कालावधीतील काम हे कर्तव्य कालावधी समजुन सेवा पुस्तकामध्ये नोंदी घेवुन त्या कालावधीत विशेष रजा हिशोबामध्ये धरावी. इ. कामे शिक्षकांनी कोविड-१९ काळात अत्यंत जबाबदारीने पार पाडली, तरी कोविड-१९ काळात शासकीय ड्युटी करीत असतांना कोरोनाची लागण होवुन मृत्यू झालेल्या शिक्षक कर्मचारी यांच्या कुटूंबियांना मदत मिळावी अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली.यावेळी प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावित, तानाजी नवगिरे, गणेश कौतीक, विश्वास देसाई, गोटू पावरा ,तुकाराम अलट आदी उपस्थीत होते.