राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यातील सर्वच कर्मचार्यांनी पुकारलेल्या संपामुळे लालपरीची चाके थांबली होती. अखेर एसटीतून सेवानिवृत्त आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या माझी चालकांना वयाच्या 62 वर्षा पर्यंत मासिक मेहनतानावर घेण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे.यामुळे लवकरच एसटी सुरू होऊन सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी व्यक्त केली आहे.
यासंदर्भात राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी राज्यातील सर्व विभागीय नियंत्रक यांना पाठवलेल्या पत्रात याबाबत आदेश पारित केले आहेत. या आदेशात म्हटले आहे की दिनांक 27 ऑक्टोंबर2021 पासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपात चालक-वाहक समाविष्ट झाल्यामुळे दैनंदिन वाहतुकीवर परिणाम होत आहे. राज्यातील प्रवाशांची गैरसोय दूर व्हावी याकरिता एसटी महामंडळ आतून सेवानिवृत्त झालेले आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या माजी चालकांना वयाच्या 62 वयापर्यंत सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मासिक मेहनताना 20000 रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले असून बडतर्फ आणि निलंबित कर्मचाऱ्यांना करारबद्ध न करण्याचा देखील आदेशात म्हटले आहे. एस टिच्या नवीन निर्णयानुसार माजी चालकांना सेवेत घेण्यापूर्वी त्यांची लेखी संमती पत्र लिहून घेण्यात येणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या अटी आणि शर्ती यांना अधीन राहून माजी चालकांना सेवेत घेण्यात येणार आहे. या सेवेदरम्यान मासिक मानधनाव्यतिरिक्त कुठलेही भत्ते आणि सुविधा उपलब्ध होणार नसल्याचे देखील नमूद करण्यात आले आहे. मासिक मेहनतानावर करारबद्ध केलेल्या चालकाच्या माध्यमातून कमी अंतराच्या फेऱ्या सुरू करण्याचे आदेश विभागीय नियंत्रकांना देण्यात आले आहेत. परिवहन महामंडळाच्या या निर्णयामुळे गेल्या दोन महिन्यापासून बंद असलेल्या एसटी पुन्हा रस्त्यावर धावण्याची शक्यता असल्याने प्रवासी वर्गांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.