म्हसावद l प्रतिनिधी
शहादा येथील शिवप्लाझाच्या सभागृहात महात्मा फुले युवा मंच ऑल इंडिया च्या वतीने आदर्श महिला शिक्षक पुरस्कार व आदर्श दांपत्य पुरस्कार वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला. हा कार्यक्रम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व महिला शिक्षक दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष आ.डॉ.विजयकुमार गावित हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी कृषी सभापती अभिजित पाटील, जि.प.सदस्या डॉ.सुप्रिया गावित, प्रांताधकारी डॉ.चेतनसिंग गिरासे, उपशिक्षणाधिकारी भानुदास.आर.रोकडे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, महात्मा ज्योतिबा फुले युवा मंचचे अध्यक्ष ईश्वर माळी हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कस्तुरी निजरे हिने मी सावित्री बोलते या विषयावर एकपात्री अभिनय सादर केला तर नवापूर येथील बालवक्ता कुशलकुमार माळी याने सावित्री ज्योती आभाळाएवढी माणसं होती या विषयावर मनोगत व्यक्त केले. या दोन लहान बालकांच्या सादरीकरणाने सर्व वातावरण भारावून गेले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ईश्वर माळी यांना सत्यशोधक भगवान रोकडे यांच्याकडून महात्मा ज्योतिराव फुले यांची पगडी व सावित्रीबाई फुले यांची पुस्तके डॉ विजयकुमार गावीत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.यावेळी नाशिक, नगर, धुळे, नंदुरबार, जळगाव या पाच जिल्ह्यातून सुमारे पंचावन्न आदर्श महिला शिक्षिकांना सन्मानित करण्यात आले. आदर्श दाम्पत्यात चाळीसगाव तालुक्यातील सुवर्णा राजेंद्र माळी व राजेंद्र दादासाहेब माळी नंदुरबार येथील मीनाक्षी मधुकर देसले व मधुकर आत्माराम देसले, नवापूर येथील रोहिणी आत्माराम महाजन व डॉ.आत्माराम भानजी महाजन, शहादा येथील संगीता हिरालाल पाटील व डॉ. हिरालाल मंगल पाटील,कळंब येथील तेजस्विनी प्रवीण वाघ व प्रवीण पंडित वाघ, शहादा येथील लताबाई पंडित जाधव व पंडित बुधा जाधव यांना मान्यवरांच्या हस्ते आदर्श दांपत्य पुरस्कार वितरित करण्यात आला.
प्रास्तविकात अध्यक्ष ईश्वर माळी यांनी गेल्या तीन वर्षापासून हा उपक्रम सुरू असून त्यातून महिलाना सावित्रीमाई फुले यांची स्त्री शिक्षणाची प्रेरणा मिळावी हा उद्देश आहे. यासोबतच आदर्श दाम्पत्य उपक्रम देखील या वर्षापासून सुरू करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी अभिजित पाटील म्हणाले, सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सातत्याने असे उपक्रम झालेच पाहिजे. या उपक्रमांच्या माध्यमातून काम करून पुरस्कार मिळणार्या शिक्षकांना कामाची प्रेरणा मिळते, असे ते म्हणाले.
प्रांतधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी सांगितले, घरात राहणार्या आई आजी यांनादेखील सामाजिक प्रतिष्ठा कशी मिळेल यासाठी सामाजिक संस्थांनी प्रयत्न करावा. आदर्श दांपत्य पुरस्कार हा आगळा वेगळा कार्यक्रम असल्याचे सांगत महिलांना केंद्रबिंदू ठेवून उपक्रम राबविल्यास महिलांचे विविध प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.यावेळी आ.डॉ.विजयकुमार गावित म्हणाले, थोर व्यक्तींची जयंती साजरी करताना सामाजिक उपक्रमातून प्रेरणा-जागृती मिळत असते. चांगले आचार विचार आपण आत्मसात केले पाहिजे, त्यातून वैचारिक दिशा मिळते, असे ते म्हणाले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा बोरसे तर आभार प्रदर्शन गोरख वाल्हे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयनगर हेरंबा गणेश मंडळाचे अध्यक्ष हिरालाल माळी, प्रा डॉ नितीनकुमार माळी संचालक गोरखतात्या माळी, सत्यशोधक भगवान रोकडे, राकेश माळी, राजेंद्र माळी, प्रकाश कारंजे, मधुकर माळी, अक्षय माळी,अनिल भामरे तसेच महात्मा फुले युवा मंच या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.








