नंदूरबार l प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काल्लेखेतपाडा ता.धडगाव या शाळेत बालसंसद या उपक्रम अंतर्गत लोकशाहीच्या महोत्सवाचं म्हणजेच प्रत्यक्ष गुप्त मतदान पद्धतीने शाळेची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री निवड करण्यात आले. या लोकशाही महोत्सवाचे आयोजन नववर्षाच्या प्रभात समयी करण्यात आले होतं.
लोकशाही पद्धतीने निवडणूका कशा घेतल्या जातात. सरपंच, आमदार, खासदार, मुख्यमंत्री , पंतप्रधान यांची निवड कशी होते. हा नागरिक शास्त्राचा घटक प्रत्यक्ष अनुभवाद्वारे समजणे हेतू सदर उपक्रम निवडणूक आयोगाच्या पध्दतीने घेण्याचा ठराव शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने घेण्यात आला. यासाठी शालेय बाल संसद निवडणूक आयोग गठित करण्यात आले. या आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त हे शाळेचे मुख्याध्यापक रुपेशकुमार नागलगावे हे होते.तर त्यांच्या नेतृत्वाखाली विविध समित्यांच्या गठीत करण्यात आले. त्यात प्रामुख्याने चिन्ह वाटप समिती लक्ष्मीपूत्र उप्पीन , आचारसंहिता समिती दशरथ पावरा , मतदान यादी जाहीर करणे समिती तेगा पावरा आणि अर्ज स्वीकृती व मंजुरी समिती बालमित्र जितेंद्र पावरा यांच्या नेतृत्वाखालील समितीने संपूर्ण निवडणूक प्रक्रिया मोठ्या उत्साहाने पार पाडला.
निवडणूक घेण्याविषयीची घोषणा श्री.नागलगावे यांनी २८ डिसेंबर, २०२१ रोजी जाहीर केला. तर २९ डिसेंबर ला फॉर्म भरणे व दुपारी ३ पर्यंत माघार घेणे प्रक्रिया पार पाडली. यावेळी ६ उमेदवार फॉर्म भरले परंतु त्यापैकी २ उमेदवार यांनी फॉर्म माघार घेतली. त्याच दिवशी उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. ते पुढील प्रमाणे राहुल संजय पावरा – शिट्टी ( चौथी) , पूजा भरत पावरा – शाळेची बॅग ( सातवी) , मनीषा अंधाऱ्या पावरा – पुस्तक (आठवी) , हरेश माका पावरा – चेंडू ( आठवी) याप्रमाणे चिन्ह वाटप चिठ्या टाकून करण्यात आले.

दि . २९ ते ३१ डिसेंबर दरम्यान शाळेच्या वेळेत म्हणजेच मधली सुट्टी, जेवणाची सुट्टी आणि वर्गाच्या बाहेर व फक्त शाळेच्या आवारात प्रचाराला मान्यता दिली व तशी आचारसंहिता तयार करण्यात आली. आचारसंहिता मोडल्यास उमेदवारी अर्ज बाद करण्यात येईल असं ठरवण्यात आलं. प्रत्यक्ष खेळीमेळीच्या वातावरणात प्रचाराचा फड तीन दिवस मोठ्या उत्साहात रंगला..
या मतदान प्रक्रियेत शाळेच्या २२८ विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समितीचे १४ सदस्य, स्वयंपाकीन 3 सदस्य, शाळेचे ४ शिक्षक व बालभवनचे १ बालमित्र असे एकूण २५० जणांची मतदार यादी जाहीर करण्यात आली.
१ जानेवारी , २०२२ रोजी सकाळी ठीक ८:३० ते ११:०० पर्यंत प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया घेण्यात आली. यावेळी तालुका मतदान अधिकारी म्हणून धडगाव पंचायत समितीचे शिक्षणाविस्ताराधिकारी शिलवंत वाकोडे, धनाजे केंद्राचे केंद्रप्रमुख बी. डी. पाडवी यांनी भेट दिली. बाह्य निरीक्षक व मतमोजनी रमेश नवले व अतुल गोडसे यांनी जबाबदारी पार पाडली. सदर प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांमधून मतदान अधिकारी – १ अंजली केशव पावरा , मतदान अधिकारी -२ शीतल किसन पावरा, मतदान अधिकारी -३ म्हणून रोहित बाबुराव पावरा याने तर केंद्राध्यक्ष म्हणून सुरज तेरसिंग पावरा याने काम पाहिले.तर पोलीस प्रतिनिधी म्हणून शाळेचे विद्यार्थी कुमार. पवन बाबुराव पावरा , गणेश दिलीप पावरा, सचिन लकड्या पावरा यांनी काम पाहिले.
प्रत्यक्ष मतदान कोविड -१९ च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून ६ फुटाचे एका मतदारात अंतर ठेऊन घेण्यात आले. २५० पैकी २२९ म्हणजेच ९१.६० टक्के इतके झाले. ११ वाजता मतमोजणीस सुरुवात झाली व ११:३० निकाल घोषित करण्यात आला. त्यात राहुल संजय पावरा यास १६ मत पडले, तर हरेश माका पावरा यास १५ मते मिळाली. तर उपविजेतेपद म्हणजेच शाळेची उपमुख्यमंत्री कुमारी मनीषा आंधाऱ्या पावरा हिला ९० मते मिळाली तर शाळेची मुख्यमंत्री म्हणून प्रत्यक्ष व गुप्त मतदान पद्धतीने कुमारी पूजा भरत पावरा हिला १०६ मते मिळाली व ती विजयी घोषित करण्यात आली. संपूर्ण निकाल शिलवंत वाकोडे व बी डी पावरा या समितीने घोषित केली. अशा पद्धतीने पूजा बनली ‘काल्लेखेतपाड्याच्या बाल संसदेची तिसरी मुख्यमंत्री.
यावेळी शिलवंत वाकोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अब्राहम लिंकन यांचे उदाहरण देऊन शालेय नेतृत्वातून कसा व्यक्तिमत्व विकास होतो याविषयी मार्गदर्शन केलं. शाळेच्या व बाल संसदेच्या पुढील मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ यास हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या संपूर्ण प्रक्रियेसाठी मदत केलेले शाळा व्यवस्थापन समिती, पालक , तरुण मित्र , बाह्य निरीक्षक, तालुका अधिकारी, विद्यार्थी व पत्रकार किसन पावरा यांचे शाळेच्या बाल संसद निवडणूक मंडळाच्या वतीने लक्ष्मीपुत्र उप्पीन यांनी आभार व्यक्त केले.








