म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद येथे भरचौकात असलेले सोन्याचांदीचे दुकान आणि भांड्याचे दुकान फोडून वर्षाच्या पहिल्याच दिवशी चोरांनी डाव साधला असून रोकडसह एक लाख पासष्ट हजार रूपयाचे दागीने व भांडी चोरून नेली आहेत.म्हसावद पोलीसांना वर्षाच्या पहिल्याच दिवशी चोरांनी आव्हान दिले आहे.


याबाबत म्हसावद पोलीस सुत्रानुसार माहीती अशी की,शनिवारी रात्री म्हसावद येथील बाजारपेठेत हनुमान चौकात असलेले निलेश नंदकिशोर शिंपी(शहादा) यांचे शिव ज्वेलर्स व जितेंद्र ब्रिजलाल शिंपी(म्हसावद) यांचे लक्ष्मी स्टील नावाचे भांड्यांचे दुकान चोरांनी शटर उचकवून चोरी केली.यात शिव ज्वेलर्सच्या दुकानातून चांदीच्या बांगड्या जोड, वेल्याचा जोड,अंगठ्या,मंदीरातील देवाना असलेला दागीन्यांचा चांदीचा श्रृंगार, पाटल्या, साखळ्या, गोट,तार,बाळ्या,सी.सी.टी.व्ही कॅमेरा,एल.ई.डी असा एकून एक लाख सत्तेचाळीस हजाराचा माल लंपास केला तर लक्ष्मी स्टील दुकानातून स्टीलचा गल्ला,चिल्लरसह रोकड अठरा हजार रूपयाची चोरी केली. चोरांनी चोरी करून म्हसावद पोलीस स्टेशनच्या कुंपणलगत असलेल्या काटेरी बाभळीत हिस्से वाटणी केली ही विशेष बाब आहे.त्या ठिकाणी ज्वेलर्सच्या दुकानातून चोरून आणलेल्या दागीन्यांच्या पेट्या ऊघडवून चोरांनी महत्वाची कागदपत्रे,सीसीटीव्ही कॅमेरा साहीत्य,पॅकींग साहीत्य फेकून दिले होते.घटना स्थळी पोलीस विभागीय अधिकारी श्रीकांत घुमरे,स्थानिक गुन्हा अन्वेषन शाखेचे रविंद्र कळमरकर,म्हसावद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार,पोलीस उपनिरीक्षक सुनिल बि-हाडे यांनी भेट देवून चौकशी केली.डॉग स्क्वाडने कन्हेरी नदीवरील पुलापर्यंत मार्ग दाखवून थांबले.याबाबत म्हसावद पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.








