बोरद l वार्ताहर
बोंडअळीसह बुरशीजन्य रोगांमुळे उत्पादनात घट झाली असून शेतकऱ्याचा खर्च ही निघणे मुश्किल झाले आहे. याला कंटाळून तळोदा तालुक्यातील मोड येथील कापूस उत्पादक शेतकरी किशोर पाटील यांनी उभ्या कापसाच्या पिकावर नांगर फिरवल्याची घटना घडली आहे.
तळोदा तालुक्यातील बोरद सह परिसरात कापूस पिकावर पडलेल्या बोंडअळीसह बुरशीजन्य रोगांमुळे उत्पादनात घट झाली असून शेतकऱ्याचा खर्च ही निघणे मुश्किल झाले आहे. या वर्षी पावसाच्या अनियमित पणामुळे शेतकऱ्याने प्रयत्नांची पराकाष्ठा करून कापूस जगवला होता. मात्र सतत होणाऱ्या हवामान बदलामुळे कापूस पिकावर याचा परिणाम झाला कधी अवकाळी पाऊस,गारठा, सूर्यदर्शन या अशा आस्मानी संकटाना शेतकऱ्याला सामोरे जावे लागते. या वर्षी कापसाला सात ते आठ हजार रुपये क्विंटल ने भाव असल्याने शेतकऱ्याने कापूस पिकावर मोठ्या प्रमाणात खर्च केला.पण बुरशीजन्य रोगांमुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणत घट झाली व बोंडअळी पडल्याने एकरी क्विंटल ही निघणे मुश्कील झाले. तळोदा तालुक्यातील मोड येथील कापूस उत्पादक शेतकरी किशोर पाटील यांनी उभ्या कापसाच्या पिकावर नांगर फिरवला असल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी सांगितले की,चार एकर क्षेत्रावर कापसाची लागवड केली होती. त्याला एकरी खर्च २० हजार केला असे चार एकर क्षेत्रावर एकूण ६० ते ७० हजार रु खर्च झाला मात्र चार एकर क्षेत्रात फक्त तीनच क्विंटल उत्पादन झाले.
बोरद,मोड, खरवड,मालदा, तुळजा या भागात या वर्षी कापसाची लागवड शेतकऱ्याने केली मात्र बुरशीजन्य रोगांमुळे उत्पादनात घट झाली. त्यामुळे आता शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला आधार देण्याची गरज असल्याने शासनाने पंचनामे करून मदत जाहीर करावी अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.








