नंदुरबार l प्रतिनिधी
धडगांव तालुक्यातील धनाजे खु. येथील श्री.शंकर आदिवासी विकास बहुउद्देशीय संस्था व मित्र परिवारातर्फे येथील नर्मदा परिक्रमा आश्रमात गेल्या दोन वर्षापासून नर्मदा परिक्रमा करणार्या भाविकांसाठी दोन वेळेचे मोफत जेवण व चहा नाश्ताची सोय करण्यात आली आहे. मात्र याबाबत कोणाकडेही मागणी न करता कुठलाही गाजावाजा न करता दररोज १५० ते २०० भाविकांची सेवा करण्यात येते.

कोरोना काळात जिल्हाभर अनेक नागरीक गरजूंच्या मदतीसाठी सरसावले होते. काहींनी थोडीशी मदत करत मोठा गाजावाजा करतांनाही दिसले होते. मात्र या काळातही नर्मदा परिक्रमा करणार्या भाविकांची मोठी संख्या होती. याकाळात हॉटेल बंद, दुकाने बंद त्यामुळे परिक्रमा करणार्या भाविकांपुढे अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. यावर उपाय म्हणून धडगांव तालुक्यातील धनाजे खुर्दे येथील मित्र मंडळींनी एकत्र येत कुठलाही गाजावाजा न करता नर्मदा परिक्रमा करणार्या भाविकांना मदत करण्याचे ठरविले. त्यानुसार धनाजे खुर्दे येथील आपसिंग महाराज हे नर्मदा परिक्रमा करणार्या भाविकांसाठी त्यांच्या घरीच जमेल तेवढी मदत करत असत. आपसिंग महाराजांची सुभाष पावरा यांची भेट झाल्यानंतर नर्मदा परिक्रमा करणार्या भाविकांसाठी विस्तारीतपणे आश्रम उभारून त्यांची जेवणाची व निवार्याची सोय करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार सुभाष पावरा यांनी यशवंत पाटील यांच्यासह जत्र्याबाबा यांच्यासह मित्र परिवाराला याबाबत कल्पना दिली. त्यानंतर सगळयांनी मिळून धनाजे खुर्दे येथे जागा विकत घेवून आश्रम उभारला. त्याठिकाणी खा.डॉ.हिना गावीत २५.१५ मधून याठिकाणी इमारत तयार करून दिली. त्याठिकाणी सगळयांनी मिळून मंदिराची स्थापना केली. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना काळातही नर्मदा परिक्रमा आश्रमात रोज १५० ते २०० भाविक याठिकाणी मुक्कामाला थांबतात. त्यांची राहण्याची, जेवणची व आरोग्याची व्यवस्था येथे करण्यात येते. याठिकाणी सर्वांच्या मदतीने आश्रमात रोजचा खर्च केला जातो. आश्रमासाठी कोणाकडूनही पैशांची मदत न स्विकारता वस्तु स्वरूपात मदत स्विकारली जाते. कुठलाही गाजावाजा न करता गेल्या दोन वर्षांपासून १५० ते २०० नर्मदा परिक्रमा करणार्या भाविकांची येथे व्यवस्था करण्यात येते. या आश्रमासाठी सुभाष पावरा, दिपक शिवदे, लतिश मोरे, आपसिंग पावरा, घनश्याम महाराज, यशवंत पाटील, झोमा पावरा, येशु महाराज, पप्पु परमार, डॉ.संतोष परमार, जत्र्या बाबा, वेंद्या बाबा, भरत पावरा, पतंग भंडारी, बारकू महाराज यांच्या मित्र परिवारातर्फे याठिकाणी लागणारी गरजेचा पुरवठा करण्यात येतो. याठिकाणी दोघे वेळेचे जेवण स्थानिक नागरीक व नर्मदा परिक्रमा करणारे भाविक करीत असतात.

देशातील विविध राज्यातील भाविक नर्मदा परिक्रमेसाठी पदयात्रा करतात. या दरम्यान दुर्गम भागात भाविकांना राहण्याची व जेवणाची मोठी गैरसोय होते. हा विचार करून मित्र परिवारातर्फे धनाजे खुर्द येथे मित्र परिवारातर्फे नर्मदा परिक्रमा आश्रम चालवला जातो. येथे कोणाकडूनही न मागता दाते मोठया प्रमाणावर मदत करतात. मदतही पैशांच्या स्वरूपात न स्विकारता वस्तुरूपात स्विकारली जाते. सर्व मित्र परिवार याठिकाणी येवून सेवा करीत असतात.
सुभाष पावरा
धनाजे खुर्द ता.धडगांव

नर्मदा परिक्रमा करत असतांना गेल्या दोन दिवसापासून धनाजे खुर्दे येथील आश्रमात आम्ही वास्तव्य करीत आहोत. याठिकाणी भाविकांची मोठया प्रमाणावर सोय करण्यात आली आहे. निवार्यासह चहा, दोनवेळेचे जेवण, आरोग्याचीही काळजी घेतली जाते. नर्मदा परिक्रमाही प्रशासनाने किनार्यावरून करण्यात यावी.
ररमेश कुवरजी मिस्तरी
डोंबिवली (जि.ठाणे)








