नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या विविध विकासकामांची पाहणी उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी यांनी केली. गुरूवारी नंदुरबार तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील अनेक भागांची त्यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करून सूचना केल्या. लोकप्रतिनिधी लोकांच्या जीवावर निवडून येत असतात. त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे आपलं काम आहे. विकास कामे करतांना त्याचा दर्जा निकृष्ट आढळल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा रघुवंशी यांनी दिला.
नंदुरबार तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील अनेक गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध विकास कामे करण्यात आलेली आहेत. त्या कामांची पाहणी आज गुरूवारी उपाध्यक्ष ॲड राम रघुवंशी यांनी केली.
सकाळी ११ वाजेपासून ते ५ वाजेपर्यंत तब्बल ६ तास ‘स्पॉट’वर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. नाशिंदे- हाटमोहीदा रस्ता डांबरीकरणाची पाहणी करीत असतांना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून लांबी रुंदी व दर्जा तपासण्यात आला. भालेर प्राथमिक आरोग्य केंद्र, वावद ते उमर्दे रस्ता डांबरीकरण, मांजरे येथील रस्ता काँक्रिटीकरण,आराळे, लहान शहादा प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व वैद्यकीय अधिकाऱ्यांची निवास्थान, नाशिंदें ते हाटमोहिदा त्याचप्रमाणे भालेर ते कलमाडी रस्ता डांबरीकरण कामाची पाहणी केली. यापुढेही विकास कामांची पाहणी सुरूच राहणार असल्याची माहिती उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी यांनी दिली.
यावेळी पंचायत समितीचे उपसभापती कमलेश महाले, कार्यकारी अभियंता एस व्ही पवार, धर्मेंद्र परदेसी, विभागीय अभियंता ए.बी.गांगुर्डे, सहायक अभियंता,पी.ए पाटील, सहायक अभियंता, आय.आर सोनवणे, शाखा अभियंता यु.टी कनिष्ठ अभियंता, नेरकर उपस्थित होते.








