नंदुरबार | प्रतिनिधी
सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षांसाठी पशुसंवर्धन विभागामार्फत विविध योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांकडून ३१ जुलै २०२१ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.
विशेष घटक योजनेंतर्गत दुभती जनावरे (अनुसूचित जातीकरिता), विशेष घटक योजनेतर्गत शेळी गट (अनुसूचित जातीकरिता), विशेष घटक योजनेतर्गत पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण (अनुसूचित जातीकरिता), सर्व साधारण, आदिवासी उपयोजनेतर्गंत वैरण विकास कार्यक्रम, एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम अंतर्गत तलंगा कोबडी पक्षी अशा विविध योजनांसाठी विहित नमुन्यात अर्ज सादर करावयाचे आहेत.
सर्व योजनांचा लाभ थेट हस्तातंरण (डीबीटी ) द्वारे करण्यात येणार असून योजनेच्या अधिक माहिती व विहीत नमुन्यातील अर्जासाठी संबंधित तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जिल्हा परिषद) उ.दे.पाटील यांनी केले आहे.