नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील हातधुई आश्रम शाळेत इयत्ता बारावी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धडगाव तालुक्यातील हातधुई आश्रम शाळेत इयत्ता बारावी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या आकाश बावा तडवी या १८ वर्षीय विद्यार्थ्याने शाळेच्या आवारातून ५० मीटर लांब झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मयत विद्यार्थी गेल्या पाच दिवसापासून बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती आहे.
शाळे हुन पन्नास मीटर लांब अंतरावर असलेल्या झाडाला आकाश बावा तडवी या विद्यार्थ्याचा मृतदेह गळफास घेतल्याचे आढळून आल्यानंतर शाळा प्रशासनाने कुटुंबाला न कळवता परस्पर धडगाव पोलिसांना बोलवून पंचनामा करून शवविच्छेदन ही करून आणल्यानंतर परिवाराला माहिती दिली. त्यामुळे सदर मुलाने आत्महत्या का केली याचं कारण अस्पष्ट आहे.
तरी आमच्या मुलाच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी परिवाराने केली आहे.तळोदा आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत हातधुई आश्रम शाळा येत असून प्रकल्प अधिकारी मैंनक घोष यांना याबाबत विचारले असता सदर मृत्यूबाबत शवविच्छेदनाच्या रिपोर्ट नंतर चौकशी समिती नेमून मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत चौकशी केली जाणार असल्याची माहिती दिली आहे.सदर घटनेबाबत धडगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू असल्याचे माहिती माहिती देण्यात आली आहे, तर दुसरीकडे मयत विद्यार्थ्यांच्या परिवाराने मृतदेह घेण्यास नकार देत कठोर कारवाईची मागणी केली आहे. मुख्याध्यापकांच्या कार्यालयात असलेल्या मृत देहा शेजारी परिवार ठाण मांडून बसले आहे. आपल्या मुलाच्या आकस्मिक मृत्यूने आई-वडील भाऊ हतबल झाले आहे. तळोदा प्रकल्प अधिकारी यांच्यावतीने सदर मृत्यू बाबत चौकशी करून कारवाई चे पत्र दिल्यानंतर परिवाराने मृतदेह ताब्यात घेतला असून अंत्यविधीसाठी रोख दहा हजार रुपये देऊन आदिवासी प्रकल्पच्या वतीने दोन लाख सानुग्रह मदतीचे कार्यवाही सुरू असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.








