नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील मनखेडी खुर्द कारभारीपाडा येथे पोषण आहाराचा अपहार करत जाब विचारण्यासाठी गेलेल्या अंगणवाडी सेविकेला मारहाण केल्याप्रकरणी चार संशयितांविरोधात धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , धडगाव तालुक्यातील मनखेडी कारभारीपाडा येथील रणजित वेल्या पराडके , केशव वेल्या पराडके , जयसिंग वेल्या पराडके व भाईदास रणजित पराडके या चौघांनी संगनमत करुन अंगणवाडीतील लाभार्थ्यांसाठी आलेला शासकीय पोषण आहारातील ६० किलो गहू , ६० किलो तांदुळ , ६० किलो चवळी , ३० किलो साखर व ३१ पाकीटे हळद , ३१ पाकीटे मिरची पावडर , ३१ पाकीटे मीठ असा मुद्देमाल स्वतःच्या फायद्यासाठी नवीन अंगणवाडीच्या इमारतीत उतरवून घेत त्यास कुलूप लावले व चावी स्वतःजवळ ठेवून अपहार केला . याबाबत अंगणवाडी सेविका सविता कालशा पराडके विचारपूस करण्यासाठी गेल्या असता त्यांना तुला करायचे आहे ? तुला नोकरी करु देणार नाही , अशी धमकी देत शिवीगाळ करुन दमदाटी केली . तसेच पाठीवर मारहाण करुन दगड मारुन फेकला . सविता पराडके यांचे पती वाचविण्यासाठी गेले असता त्यांनाही दगड मारुन फेकत चष्मा फोडून दुखापत केली . याप्रकरणी सविता पराडके यांच्या फिर्यादीवरुन रणजित वेल्या पराडके , केशव वेल्या पराडके , जयसिंग वेल्या पराडके व भाईदास रणजित पराडके सर्व रा.मनखेडी कारभारीपाडा ता.धडगाव या चौघा संशयितांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी भादंवि कलम ३५३ , ४०३ , ४२७ , ५०४ , ५०६ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याप्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दिलीप महाजन करीत आहेत .








