नंदुरबार l प्रतिनिधी
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सन 2021-2022 या आर्थिक वर्षांसाठी सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभाग घेऊन विवाह करणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्गातील तसेच विशेष मागास प्रवर्गातील दांपत्यांनी व स्वयंसेवी संस्थांनी कन्यादान योजनेसाठी प्रस्ताव सादर करावे. असे आवाहन सहायक आयुक्त, देवीदास नांदगावकर यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत सामुहिक विवाह सोहळयामध्ये भाग घेणा-या मागासवर्गीय दांपत्यांना 20 हजाराचे वस्तुस्वरुपात अनुदान लग्नाच्या दिवशी वधुचे वडील,आई किंवा पालकांना देण्यात येईल तर सामुहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या पात्र स्वयंसेवी संस्थाना प्रती जोडण्यामागे 4 हजाराचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते.
सामुहिक विवाह सोहळयात सहभागी दांपत्यांस आर्थिक सहाय्यसाठी पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे ; वधु व वर हे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, सामुहिक विवाह सोहळयामध्ये भाग घेणा-या दांम्पत्यांस देण्यात येणारे अनुदान त्यांच्या प्रथम विवाहासाठीच देय राहील.अर्जासोबत सक्षम अधिकाऱ्यांने प्राधिकृत केलेले जातीचा दाखला,नवदांपत्यातील वधु,वर यापैकी दोन्ही किंवा एकजण हे अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती (धनगर व वंजारीसह ) विशेष मागासवर्ग व इतर मागास प्रवर्गातील असावा.दांपत्यांपैकी वराचे वय 21 व वधुचे वय 18 वर्षापेक्षा कमी असु नये. वधु व वर यांच्या प्रथम विवाहासाठीच हे अनुदान अनुज्ञेय असेल. सदरील योजनेचा लाभ विधवा महिलेस दुस-या लग्नाकरिता देखील अनुज्ञेय राहील. बालविवाह प्रतिबंधक कायदा व हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत कलमाचा भंग दांपत्य, कुंटुबांकडुन झालेला नसावा.
सामुहिक सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्था,यंत्रणेसाठी निकष पुढील प्रमाणे; स्वयंसेवी संस्था/ यंत्रणा स्थानिक नोंदणी अधिनियम,1960 व सार्वजनिक विश्वस्त अधिनियम,1850 अंतर्गत नोंदणीकृत असावी. सामुहिक विवाहासाठी कार्य करणारी स्वयंसेवी संस्था/यंत्रणा सेवाभावी असावी. सामुहिक विवाह सोहळयामध्ये केला जाणा-या खर्चासाठी प्रति पात्र जोडपे 4 हजार शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील. सामुहिक विवाह सोहळयासाठी किमान 10 दांपत्ये (20 वधु व वर) असणे आवश्यक आहे. सामुहिक विवाह सोहळयातील विवाहांची नोंदणी करण्यासाठी विवाह नोंदणी अधिकारी , सामाजीक न्याय विभागाने गट-अ व गट-ब चे अधिकारी तसेच विस्तार अधिकारी, गट विकास अधिकारी, नायब तहसिलदार ,तहसिलदार यांनी प्रत्यक्ष हजर राहणे आवश्यक आहे. सेवाभावी संस्था /यंत्रणेने सामुहिक विवाह सोहळयामध्ये सहभागी झालेल्या विमुक्त जाती भटक्या जमाती , इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील जोडप्यांची माहिती ,सबंधितांची छायाचित्रे, विहित नमुन्यातील अर्ज इ. कागदपत्रे विवाह संपन्न होण्याच्या किमांन 30 दिवस अगोदर सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,नंदुरबार यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त समाज कल्याण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, टोकरतलाव रोड,नंदुरबार येथे संपर्क साधावा.








