धडगाव l प्रतिनिधी
धडगाव वडफळ्या रोषमाळ बु. नगरपंचायतीच्या 17 जागासाठी आज दि. 21 डिसेंबर रोजीमतदान होणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज आहे.मतदान प्रक्रियेत नगरपंचायतिच्या 17 वार्डातील एकूण 7 हजार 523 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
धडगाव वडफळ्या रोषमाळ बु. नगरपंचायतिच्या निवडणूकीसाठी एकूण 17 मतदान पथक नियुक्त करण्यात आले आहेत, तसेच 8 मतदान पथक राखीव ठेवण्यात आले आहेत. सतरा मतदान केंद्रावर एकूण 102 मतदान कर्मचारी व प्रत्येक केंद्रावर एक पोलीस कर्मचारी याप्रमाणे एकूण 17 पोलीस कर्मचारी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आले आहेत. नगरपंचायतच्या निवडणूकीसाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यात 1 उपविभागीय पोलिस अधिकारी, 2 पोलीस निरीक्षक,6 एपिआय व पीएसआय, 62 पुरुष पोलीस कर्मचारी, 12 महिला पोलीस कर्मचारी, 56 पुरुष होमगार्ड तर 19 महिला होमगार्डचा समावेश आहे. एकूण सतरा जागासाठी होत असलेल्या निवडणूक प्रक्रियेत 48 उमेदवार आपलें नशीब आजमावत आहे. उद्या होणाऱ्या मतदान प्रक्रियेत नगरपंचायतिच्या 17 वार्डातील एकूण 7 हजार 523 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून यात पुरुष मतदार 3 हजार 712 व स्त्री मतदार 3 हजार 712 अशी आहे.
दरम्यान सर्व मतदान केंद्रावर वाहनातून मतदान साहित्यांसह मतदान कर्मचारी पोहोचविण्यात आले असून कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्र ताब्यात घेऊन उद्याच्या मतदान प्रक्रियेच्या तयारीला सुरुवात केली आहे.अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनंत जवादवार निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. चेतन गिरासे, तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांनी दिली आहे. शहरात सर्वत्र शांतता असून कुठलाही अनुचित प्रकार घडून आला नाही.








