नंदूरबार l प्रतिनिधी
जीवनात सर्व पापांचे प्रायश्चित्त असले तरी, स्त्रीभ्रृण हत्येसारखे सर्वात मोठे पाप नाही. प्रत्येकाला वंशाचा दिवा पाहिजे म्हणुन दोन्ही घरी प्रकाश देणार्या मुलीला मारण्यासारखे पाप केले जाते. आई, बहिण, आजी, पत्नी, आत्या अशी सर्व नातेही मुलींना अनुसरुन असून देखील मुलीची हत्या करण्यासारखे पाप अनेक जण करतात. कंसने आपल्या बहिणीच्या अपत्याला मारण्याचे पाप केले, त्याची शिक्षा अखेर भगवान श्रीकृष्णांनी कंसला दिली. म्हणुन आपण केलेल्या स्त्रीभ्रुण हत्येचा हिशोब देखील होतो. हे पाप करण्याऐवजी मुलींना जन्म घेवुन द्यावा, असा संदेश भागवताचार्य, रामायणाचार्य तथा प्रसिद्ध ज्योतिषाचार्य प.पु.पं अतुल शास्त्री भगरे गुरुजी यांनी कथा निरुपणातून दिला.
नंदुरबार येथील नंददर्शन व चित्ते परिवाराच्या वतीने स्व.जुलालसिंग बाजीराव राजपूत (जिभाऊ) व स्व.उषादेवी जुलालसिंग राजपूत यांच्या स्मरणार्थ श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ कथा सप्ताह सुरु आहे. या सप्ताहातील सहावे पुष्प भागवताचार्य प.पु.पं अतुल शास्त्री भगरे गुरुजी यांनी श्रीकृष्ण बाललीला, गोवर्धन पुजा, कालियामर्दन, यमलाअर्जुन उध्दार, कालयवन मुचकुंद, उध्दव गोपी संभाषण, श्रीकृष्ण मथुरागम यावर गुंफले. यावेळी भगरेगुरुजी म्हणाले की, आजच्या बदल्यात युगात प्रगती होत असली तरी दुसरीकडे मात्र पापचे प्रमाणही वाढले आहे. अनेकांना धार्मिकतेचा विसर पडला असून त्यांना पाप-पुण्याची कुठली पर्वा नसल्याने ते अपकृत्य करतात. आज मुलींची संख्या सर्वात कमी आहे, या कारण म्हणजे स्त्रीभ्रृण हत्या आहे. मुलीला मारण्यासाखे सर्वात मोठे पाप असून या पापाचे प्रायश्चित्त कुठेच नाही. प्रत्येकाला मुलगा हवा, पण मुलगी नको या विचारसरणीने स्त्रीभ्रृण हत्या सारखे पाप केले जाते. मुलांप्रमाणे मुलींना या जगात जीवन करण्याचा अधिकार व हक्क आहे. एकीकडे स्त्री-पुरुष समानतेचा नारा दिला जातो, तर दुसरीकडे स्त्रीभ्रृण सारख्या हत्या मुलींच्याबाबत केली जाते ही निंदणीय बाब आहे. भगवान विष्णूंनी मातेची सेवा करण्यासाठी वासुदेव-जानकीच्या पोटी श्रीकृष्ण म्हणुन जन्म घेतला. मग मातेची सेवा ही गोसेवा असो की, देवकी व यशोमती मातेची सेवा असे हे एकच कार्य श्रीकृष्णांनी मानले. गायीला दैवत मानले जाते. म्हणून गोमातेची सेवा करण्यासाठी प्रभूंनी योगेश्वर श्रीकृष्ण अवतार घेतल्याने भगवान श्रीकृष्णांना गोमाता प्रिय आहे. गायीचे गोमूत्र सर्व आजारावर एक रामबाण उपाय असल्याचे प.पु.पं.भगरेगुरुजींनी श्रीकृष्ण कथेतील व्यक्तीमत्त्वांचे उपदेश दिले. या कथा सप्ताहात रासलिला झाली. यावेळी ‘गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल मधुबाल…’, ‘आयी माखन चोरन की सेना, जरा संभल के ही रहेना…’, यासह अनेक श्रीकृष्णांच्या गितांवर बालगोपालांनी मनसोक्तपणे नृत्य केले. त्यानंतर बालगोपालांनी मानवी मनोरा तयार करुन बालकृष्णाची वेषभुषा साकारलेल्या वरद जितेंद्रसिंग राजपूत या बालकाने दहीहंडी फोडली. यावेळी हरे कृष्ण कृष्ण व राधे राधेचा जयघोष व भगवान कृष्णांच्या दहीहंडी गितांवर भाविक रमले.