नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील सोनाबाई नगरात दागिन्यांना पॉलिश करुन देण्याच्या बहाण्याने दोन भामट्यांनी १ लाख ८० हजाराच्या सोन्याच्या बांगड्या घेवून पसार होत महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील सोनाबाई नगरात अरुण काशिनाथ शिंपी यांच्या घरी दोन अज्ञात व्यक्ती आले. यावेळी अरुण शिंपी यांच्या पत्नीस दोघांनी दागिन्यांना पॉलिश करुन देतो असे सांगत त्यांचा विश्वास संपादन करुन १ लाख ८० हजार रुपये किंमतीच्या ६ तोळे वजनाच्या चार सोन्याच्या बांगड्या घेवून पॉलिश न करता पोबारा करत महिलेची फसवणूक केली. याबाबत अरुण शिंपी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात दोघा अज्ञातांविरूद्ध भादंवि कलम ४२०, ४१७, ४१९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मुकेश पवार करीत आहेत.










