शहादा | प्रतिनिधी
कानडी ता.शहादा येथे किरकोळ कारणावरून एकाचा खुन करण्यात आला असून मारहाण करणार्यास म्हसावद पोलीसांनी अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस सुत्रानुसार असे की,गुरूवारी सांयकाळी मयत हेमराज रतिलाल राठोड (२५) यांच्या सोबत गावात राहणारे ईश्वर पवार यांच्या घराच्या ओटयावर गप्पा मारत बसलेले असतांना संशयीत आरोपी शिल्या धर्मा भिल (४०) रा.कानडी ता.शहादा हा सदर ठिकाणी आला व त्याने हेमराज यास तुझ्या कडुन मी कधी दोन हजार रुपये घेतले, माझी बदनामी का करतोस असे आदिवासी भाषेत बोलुन शिवीगाळ करुन मयताच्या मानगुटीला पकडुन गळा जोरात दाबुन धरुन मयताचा खुन केला व छोटा चाकु काढुन शिवीगाळ केली व ईश्वर पवार हा भांडण सोडवण्यासाठी आला असता, आरोपीच्या हातातील चाकु ईश्वरच्या हातास लागुन ईश्वरच्या हाताचे बोटास दुखापत झाली.याप्रकरणी अनिल धर्मा पवार याने याबाबत म्हसावद पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून भा.द.वि.क.३०२,३२४,५०४ प्रमाणे संशयीत आरोपी शिल्या धर्मा भिल यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. घटनास्थळी उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमर, पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी पोलीस पथकासह भेट दिली असुन सदर गुन्हयाचा तपास म्हसावद पो.स्टे.चे पोलीस उपनिरीक्षक सुनिल बिर्हाडे करीत आहेत.








