तळोदा l प्रतिनिधी
तळोदा शहरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात येत्या दि.१२ डिसेंबरपासून श्री दत्त जयंती निमित्त अखंड नामजप यज्ञ-याग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
तळोदा येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात दिंडोरी प्रणित अखंड नामजप यज्ञ सप्ताह ला १२ डिसेंबर पासून सुरुवात होत आहे. या सप्ताहात अखंड प्रहर सेवा होणार आहे यात सात दिवस 24 तास अखंड सेवा चालणार आहे. या सेवेत वीणावादन, श्री स्वामी समर्थ मंत्र जप, श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत वाचन होणार आहे. या सेवेत दिवसातून एक तास आपण दिल्याने आपले आजारपण ,पीडा , दूर होऊन आयुष्य वृद्धिंगत होते अशी समर्थ सेवेकऱ्यांची अतूट श्रद्धा आहे. व तसा अनुभव देखील बऱ्याच सेवेकऱ्यांना आला आहे. हिंदू धर्मातील पाचवा वेद, मानवी जीवनातील दुःख संकटे, पीडा, शाप, दोष, यावर एक रामबाण उपाय म्हणजे गुरुचरित्र पारायण होय. गुरुचरित्र पारायण वाचनाने चमत्कारिक अनुभवांची जाणीव होते व मानवी जीवनातील इच्छा, प्रश्न सोडवण्यासाठी एक संजीवनी म्हणजे गुरुचरित्र पारायण होय अशा या शक्तिशाली मंत्रांनी भरलेल्या ग्रंथाच्या वाचण्यासाठी जास्तीत जास्त सेकऱ्यांनी आपले नाव श्री स्वामी समर्थ केंद्रात नोंदवावे. तसेच या सप्ताहात प्राधानिक स्वरूपात भागवत पारायण, नवनियुक्त गुरुचरित्र पारायण, श्री दुर्गा सप्तशती पाठ, श्री स्वामी चरित्र पारायण, श्री नवनाथ पारायण, या सेवा देखील होणार आहे.
दि.१२ डिसेंबर वार रविवार रोजी स्थापना, स्थापित देवता हवन, नित्यस्वाहाकार दि.१३ डिसेंबर वार सोमवार रोजी नित्यस्वाहाकार, गणेश याग दि.१४ डिसेंबर वार मंगळवार रोजी नित्यस्वाहाकार, स्वामी याग, दि.१५ डिसेंबर वार बुधवार रोजी नित्यस्वाहाकार, गीताई याग, दि.१६ डिसेंबर वार गुरुवार रोजी नित्यस्वाहाकार, चंडी याग दि.१७ डिसेंबर वार शुक्रवार रोजी नित्यस्वाहाकार, रुद्रयाग दि.१८ डिसेंबर वार शनिवार रोजी नित्यस्वाहाकार, बलीपुर्णाहुती दुपारी: 12:39 वा. श्रीदत्त जन्मोत्सव. दि.१९ डिसेंबर वार रविवार रोजी श्री सत्यदत्त पूजन, देवता विसर्जन, सांगता महाप्रसाद व नंतर या सप्ताहाची सांगता होणार आहे तळोदा शहर व तालुक्यातील व परिसरातील जास्तीत जास्त भाविकांनी या सप्ताहात सहभागी व्हावे असे आव्हान श्री स्वामी समर्थ केंद्र तर्फे करण्यात आले आहे.सदर सर्व सात दिवस चालणारी ही सेवा कोविड-१९ महामारीमुळे शासनाने दिलेल्या सर्व नियम पाळून करण्यात येणार आहे.
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात दर रविवारी व गुरुवारी प्रश्नोत्तराची सेवा दिली जात असते तरी ज्या सेवेकर्यांना आपले जीवनातील काही अडीअडचणी व प्रश्न असतील त्यानी सायं-5 वाजता केंद्रा मध्ये यावे. तसेच दर रविवारी केंद्रात बालसंस्कार घेतले जात असतात या बालसंस्कारात सर्व पाल्यांनी आपल्या मुलाला पाठवावे असे श्री स्वामी समर्थ केंद्रामार्फत सांगण्यात आले आहे.