नंदुरबार | प्रतिनिधी
गेल्या ३३ दिवसांपासुन कर्मचार्यांच्या मागणीसाठी लालपरी बंद असल्याने याचा सर्वसामान्यांना फटका बसत आहे.त्यातच कोरोनामुळे गेल्या पावणे दोन वर्षांपासुन बंद असलेल्या शाळा काही प्रमाणात सुरू झाल्या आहेत.त्यातच लालपरी बंदमुळे विद्यार्थ्यांना देखील फटका बसत आहे. धडगांव तालुक्यात विद्यार्थी बस नसल्याने खासगी वाहनातून जीवघेणा प्रवास करीत शिक्षणासाठी आटापिटा करत आहेत. तर काहीठिकाणी विद्यार्थी पायपीट करीत शाळा गाठत असल्याचे चित्र आहे.
गेल्या ३३ दिवसांपासुन कर्मचार्यांच्या मागणीसाठी लालपरी बंद आहे.त्याचा फटका सर्वसामान्य नागरीकांना असत आहे. त्यातच मार्च २०१९ मध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेवून शाळा बंद करण्यात आल्या होत्या. तेव्हापासून ते दिवाळीपर्यंत शाळा बंद होत्या. मध्यंतरी कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्यानंतर शाळांना सुरुवात करण्यात आली होती. मात्र पुन्हा कोरोना वेगाने वाढल्याने शाळा बंद करण्यात आल्या. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान झाले. काही शाळांनी मध्यंतरी विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये यासाठी ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. मात्र काही शाळा नेटवर्कअभावी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचू शकल्या नाही. धडगाव, अक्कलकुवासारख्या अतिदुर्गम भागातील काही शाळांच्या परिसरात नेटवर्कच नसल्याने येथील शाळा अनेक महिन्यांपर्यंत बंदच होत्या. त्यातच आता जिल्ह्यात कोरोना प्रादूर्भाव कमी झाल्यानंतर शाळा सुरळीत झाल्या आहेत. मात्र आता पुन्हा
लालपरी बंद झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना पायपीट करीत शाळा गाठावी लागत आहे. अतिदुर्गम भागात काही पाडे मिळून एक शाळा असल्याने तेथील विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे. तर शहरात येणार्या विद्यार्थ्यांना बसेस बंद असल्याने खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र खासगी वाहनधारक विद्यार्थ्यांचे जिवित धोक्यात घालून प्रवास होत असल्याने अपघात घडून अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे आता ग्रामीण भागात तरी बसेस सुरु व्हाव्यात अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, बसेस बंद असल्याने याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर होत आहे. एका बाजूला विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जीव धोक्यात घालून विद्यार्थी शाळेत पोहचत आहेत तर दुसर्या बाजूला एस.टी.चे कर्मचारी शासनात विलिनीकरण या मागणीवर ठाम आहेत. तर शासन मात्र यावर तोडगा काढण्यास दिरंगाई करत असल्याने सर्वसामान्यांसह याचा फटका दुर्गम-अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना बसत असल्याने तात्काळ बस सेवा सुरुळीत करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान धडगांव सह अक्कलकुवा तालुक्यात विद्यार्थ्यांचा जिवघेणा प्रवास करावा लागत असल्याचे चित्र दिसत असले तरी असाच प्रकार जिल्ह्यात सुरू आहे.शासनाने शाळा सुरू केल्या मात्र ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांचे लालपरी बंद झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना पायपीट करीत शाळा गाठावी लागत आहे. ग्रामीन भागातील अनेक नागरीकांचे परीस्थीती हलाखीची असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे कसे असा सवाल पालकांतर्फे करण्यात येत आहे.धडगांव व अक्कलकुवा तालुक्यात यापुर्वी अनेक अपघात हे वळण रस्त्यांमुळे घडले आहेत.त्यामूळे दुर्गम-अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना बसत असल्याने तात्काळ बस सेवा सुरुळीत करण्याची मागणी होत आहे.