नंदुरबार | प्रतिनिधी
व्याहूर ता.जि.नंदुरबार येथून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची कन्नड ता.औरंगाबाद येथून पोलीसांनी सुटका केली आहे. याप्रकरणी तरुणास ताब्यात घेतले आहे. अवघ्या २४ तासात उघडकीस आणलेल्या या गुन्हयाच्या कामगिरीबाबत पोलीसांचे कौतूक करण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, व्याहुर ता.जि.नंदुरबार येथील अल्पवयीन मुलगी काल दि.६ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास जी.टी.पी. कॉलेजमध्ये गेली. मात्र, दुपारपर्यंत घरी आली नाही. म्हणून तिच्या वडीलांनी व नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. परंतु ती मिळुन आली नाही. त्याचवेळेस मुलीच्या चुलत भावाकडून सदर अल्पवयीन मुलीस नांदरखेडा ता.जि. नंदुरबार येथील महेश रसाल राठोड याने लग्नाचे अमिष दाखवुन मोटारसायकल बसवून पळवून नेल्याची माहिती मिळाली. तिच्या वडीलांनी तात्काळ नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात जावून अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
सदर घटनेची माहिती नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना माहिती दिली. श्री.पाटील यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व अमलदारांचे पथक तयार करुन आरोपीस तात्काळ ताब्यात घेण्याचे आदेश दिले.
त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी पथकास धुळे, चाळीसगांव, औरंगाबाद येथे रवाना केले. समाज माध्यमांवर देखील आरोपीचा फोटो व त्याबाबतची माहिती प्रसारीत करण्यात आली होती. दि.६ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास अल्पवयीन मुलीच्या वडिलांना अनोळखी मोबाईल नंबरवरुन मॅसेजद्वारे समजले की, त्यांच्या मुलीस तिच्या इच्छेविरुध्द महेश राठोड याने औरंगाबाद जवळील एका ठिकाणी नेले आहे. सदर माहिती त्यांनी पोलीसांना कळविल्याने तपास पथकाने कन्नड येथे गुन्ह्यातील पिडीत मुलगी व आरोपीताचा शोध घेतला. परंतु ते मिळुन आले नाही. पथकाने कन्नड शहरामध्ये आरोपीताचे कोणी नातेवाईक राहतात का? याबाबत माहिती घेवून आज दि.७ डिसेंबर २०२१ रोजी पहाटे ५.०० वाजेच्या सुमारास कन्नड शहरातील औरंगजेबनगर येथुन आरोपीताच्या नातेवाईकाच्या घरातुन अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची सुटका केली व आरोपी महेश रसाल राठोड (वय-२१ रा. नांदरखेडा ता.जि. नंदुरबार) यास ताब्यात घेतले.
या कामगिरीबद्दल नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी अभिनंदन करुन पथकास विशेष रोख बक्षीस जाहीर केले आहे. तसेच अपहरण झालेल्या मुलीच्या वडिलांनी त्यांच्या मुलीची अवघ्या २४ तासाच्या आत आरोपीताच्या ताब्यातुन सुखरुप सुटका केल्याबद्दल नंदुरबार पोलीसांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक पी.आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, पोलीस उपनिरीक्षक सागर आहेर, पोलीस नाईक स्वप्नील गोसावी, पोलीस अंमलदार दिनेश चव्हाण, महिला पोलीस अंमलदार शुभांगी पाटील, पोलीस नाईक मोहन ढमढेरे यांच्या पथकाने केली.








