नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा येथे सोनार गल्लीत घर पाडण्याचे काम करु नये असे सांगत मजूरांना वीट मारुन फेकल्याने एका मजूराला गंभीर दुखापत केल्याप्रकरणी दोघांविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील न्यू असलोद येथील दीपक जयसिंग साळुंखे व त्यांच्या सोबतचे मित्र शहादा येथील सोनार गल्लीतील डॉ.चेतन बिर्ला यांचे जुने घर पाडण्याचे काम करीत होते. यावेळी योगेश सुरेश सोनार व वैभव विनायक सोनार दोघे रा.सोनार गल्ली, शहादा यांनी दीपक साळुंखे व त्याच्यासोबत असलेल्या मित्रांना घर पाडण्याचे काम करु नका असे सांगितले. तसेच तिसर्या माळ्यावरुन वीट मारुन फेकल्याने दीपक साळुंखे याच्या डोक्यास वीट लागल्याने गंभीर दुखापत झाली. याबाबत दीपक साळुंखे यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात योगेश सोनार व वैभव सोनार यांच्याविरोधात भादंवि कलम ३०७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश पवार करीत आहेत.








