नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात पोलीस दलाने धडक कारवाई करीत विविध भागात नाकाबंदी करून शनिवार रोजी दारू पिऊन वाहन चालवताना आढळलेल्या जवळपास 43 मद्यपी वाहनधारकांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहर, नंदुरबार तालुका , विसरवाडी , नवापूर , वाण्याविहिर अक्कलकुवा , तळोदा , प्रकाशा , शहादा , सारंगखेडा , धडगाव अशा विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलीसांनी ही कारवाई केली. याआधीच नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात आले आहे की , दारु पिऊन कोणीही वाहन चालवू नये , दारु पिऊन वाहन चालविणे केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर इतरांसाठी देखील धोकेदायक आहे . नागरीकांनी त्यांच्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियम पाळावे . तसेच कोणीही मद्यपान करुन वाहन चालवू नये . तरीही अनेक वाहनधारक दारू पिऊन गाडी चालवताना आढळत आहेत .
नवापूर येथे चौघाविरूध्द गुन्हा
नवापूर शहरात वाहतूकीस अडथळा निर्माण केल्याने चौघा वाहन चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवापूर शहरातील इरफान इकबाल पठाण रा.जुना बैल बाजार, नवापूर याने त्याच्या ताब्यातील मालवाहतूक वाहन (क्र.एम.एच.३९ एसी ००३०) लाईट बाजारातील मेन रस्त्यावर, रमेश हुपाजी गावित रा.कळंबा ता.नवापूर याने त्याच्या ताब्यातील मालवाहतूक वाहन (क्र.जी.जे.०५ टी ४६६८) व याकूब शाम मावची रा.सागीपाडा, नवापूर याने त्याच्या ताब्यातील मालवाहतूक वाहन (क्र.एम.एम. ३९ जे ८४२०) नया होंडा पुलाजवळील तर विनायक बेडक्या गावित (रा.आमपाडा ता.नवापूर) याने त्याच्या ताब्यातील ऍपेरिक्षा (क्र.एम.एच.३९ जे ०५०४), नया होंडा पुलाच्या रस्त्यावर लावून रहदारीस अडथळा निर्माण करतांना आढळून आले. याबाबत नवापूर पोलिस ठाण्याच चौघा वाहन चालकांविरोधात भादंवि कलम २८३ प्रमाणे चार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदिश सोनवणे करीत आहेत.
दरम्यान , नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत अचानक दुचाकी व चारचाकी वाहन चालकांची तपासणी करुन दारु पिऊन वाहन चालविणारे वाहन चालक , अति वेगाने वाहन चालविणारे वाहन चालक , सरकारी नोकरांवर हल्ला करणारे इसम , अवैध धंद्यांसाठी वाहनांचा वापर करणारे वाहन चालक आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करुन त्यांचे वाहन परवाने निलंबीत करण्यात येतील असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर . पाटील यांनीही एक दिवसाआधीच दिला होता.