नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथे शनी अमावस्येनिमित्त हजारो भाविकांनी दर्शन घेवून अनेकांनी नवसस्फूर्ती केली आहे. पहाटेपासुनच मंदिर परिसरात रांगा लागल्या होत्या. यावेळी मंदिर ट्रस्टतर्फे प्रशासनाने घालुन दिलेल्या निर्बंधानुसार कोरोना नियमांचे पालन करून भाविकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्यात येत होता.यावेळी अनेक भाविकांनी शनिदेवाकंडे कोरोनाचे संकट टळो अस साकड घातले आहे.यादरम्यान मंदिर ट्रस्टतर्फे अमावस्येला शनि दर्शनासाठी येणाऱ्या नागरीकांसाठी कोरोना लसीकरण शिबीराचेही आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान पहिला डोस 98 तर दुसरा डोस 178 असे एकूण 276 भाविकांचे लसीकरण करण्यात आले.
साडेसाती मुक्तपीठ म्हणुन ओळख असणाऱ्या खान्देशातील एकमेव शनि महाराजांचे मंदिर तालुक्याच्या ठिकाणाहून 18 कि.मी. अंतरावर असणारे शनिमांडळ येथे असून दरवर्षी अमावस्येला येथे यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते. गेल्या पावणे दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रार्दुभाव झाल्यामुळे मंदिर ट्रस्टतर्फे सदर यात्रोत्सव रद्द करण्यात आला होता. मात्र यावर्षी कोरोनाचा प्रार्दुभाव काहीसा कमी झाल्यामुळे भाविकांना दर्शनासाठी नियमांची अट घालुन खुले करण्यात आले होते. आज सकाळी 6 वाजेची महाआरती नंदुरबार जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक पी.आर.पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी मंदिर ट्रस्टच्या सदस्यांनी व स्वयंसेवकांनी उत्फूर्तपणे लक्ष देवून कोणताही अनुचित प्रकार होवू न देता भाविकांना दर्शनासाठी सहकार्य केले आहे. यानंतर दिवसभर नागरीकांनी शनिदेवांचे दर्शन घेतले. यादरम्यान अनेक व्यवसायिकांनी मंदिर परिसरात दुकाने थाटली होती. दर्शनासाठी जिल्ह्यातून नव्हे तर मध्यप्रदेश, गुजरात राज्यातून व जळगाव, धुळे येथून भाविक दर्शनासाठी हजेरी लावत असतात. याठिकाणी साडेसातीची तीव्रता कमी होवुन मुक्तता मिळते अशी श्रध्दा भाविकांची आहे. दरम्यान याठिकाणी मंडपाची व्यवस्थाही करण्यात आली होती. तसेच बाहेर गावाहून येणाऱ्या भाविकांसाठी मंदिरालगत अभिषेकासाठी मंडपाची व्यवस्था मंदिर ट्रस्ततर्फे करण्यात आली होती. यावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे वतीने चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच गावकरी व युवकांनीही मोलाचे परिश्रम घेतले आहे.
महाप्रसादाचेही आयोजन
शनीअमावस्येनिमित्त परंपरेनुसार गावकऱ्यांतर्फे पिठल-भाकर या महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. येथील जिल्हा परिषद शाळेत बाहेर गावाहून येणाऱ्या भाविकांसाठी पिठल आणि भाकराचा प्रसाद म्हणून देण्यात येतो. या प्रसादामुळे अनेक भाविकांच्या व्याध्याही दूर होतात, असे जाणकार सांगतात. शनिमांडळ गावातील प्रत्येक घरातून बाजरीची भाकरीचा प्रसाद देण्यात येतो. यासाठी गावातील युवकांनी विशेष परिश्रम घेतले.
मंदिर ट्रस्टतर्फे स्तुत्य उपक्रम
देशासह राज्यात कोरोनाने चांगलेच थैमान घातले होते. त्यापार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे उपाययोजना केल्या जात आहेत. प्रत्येक नागरीकाने लसीकरण करावे यासाठी विविध ठिकाणी जनजागृती करण्यात येत आहे. यादरम्यान मंदिर ट्रस्टतर्फे अमावस्येला शनि दर्शनासाठी येणाऱ्या नागरीकांसाठी कोरोना लसीकरण शिबीराचेही आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान पहिला डोस 98 तर दुसरा डोस 178 असे एकूण 276 भाविकांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी डॉ.मनोज गावीत, डॉ.प्रकाश धनगर, डॉ.सुनिल पदमोर व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.