तळोदा l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील आमलाड शिवारातून मादी बिबटपासून विभक्त झालेल्या दोघे नर बछड्यांना स्थलांतरित करणे संदर्भात नागपूर वनविभाग ( पी.सी.सी.एफ) प्रशासनाशी पत्रव्यवहार करून दोघे बछडे मुंबई येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली येथे शुक्रवारी या बछड्यांना वैद्यकीय तपासणी करण्यात आली व त्यांना शुक्रवारी रात्री रवाना करण्यात आल्याची माहिती वनशेत्रपाल निलेश रोडे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, तळोदा तालुक्यातील आमलाड शिवारातील तळोदा खरेदी विक्री संघाचे चेअरमन गोविंद पुरुषोत्तम पाटील यांच्या सर्व्हे नंबर 15 मधील शेतात ऊस तोडणी चालू असताना सोमवारी संध्याकाळी अचानक उसाच्या पाचटमध्ये मधून तीन बछडे ऊसतोड मजुरांना दिसले होते. दरम्यान मादी बिबटची बात पाहून सुधा बछडे घेण्यास मादी बिबट न आल्यामुळे सदर बछडे वनविभागाने ताब्यात घेतले होते. मात्र तळोदा येथील वनविभागाकडे बिबट्याचे बछड्याचीसोय होईल अशी सुविधा नसल्याने त्यांना सर्व सुविधा युक्त असे मुंबई येथील नॅशनल पार्क येथे स्थलांतर करण्यांचा निर्णय तळोदा वनविभागाने घेतला आहे. याकरिता नागपूर येथील वनविभागाकडे पत्र व्यवहार केला आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी बछड्यांना सुखरूप बोरीवली येथील नॅशनल पार्क येथे शुक्रवार रोजी रात्री वनपाल नंदू पाटील, विरसिंग पावरा व कार्यालयीन कर्मचारी यांच्या निगरानीत वनविभागाच्या शासकीय वाहनातून मुबई येथे रवाना करण्यात आल्याची माहिती वनक्षेत्रपाल निलेश रोडे यांनी दिली आहे. यापूर्वी देखील गोंडाळे शिवारातील सुदाम मगण पाडवी यांच्या शेतात ऊसाची पाचट जाळताना लागलेल्या आगीत 1 महिन्याचे दोन मादी जातीचे बछडे आगीत होरपळले गेले होते. त्यापैकी एका बछड्याच्या आगीत होरपळून मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या बछड्याचे पंजे व शेपूट भाजलेले अवस्थेत आढळून आले होते. वन विभागाने त्या बछड्यास निगराणी ठेवून औषोपचार केले होते. मात्र त्यांच्या वजनात कमालीची घट येत होती, याशिवाय बछड्यास आवश्यक तेवढे तापमान संतुलित करणे, वेळोवेळी त्यांच्यावर औषोधपचार करून त्यांची निगा राखणेसाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत ठरत होती. त्यामुळे त्या बछड्यांना साधारणतः चार ते पाच दिवस वनविभागाने आपल्या निगरानीत ठेवले होते. मात्र त्यांच्या वजनात वाढ होत नसल्याने त्यांना नागपूर येथील ताडोबा अभ्यारण्यात रवाना करण्यात आले होते.









