नवापूर | प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील नवापूर-विसरवाडी महामार्गावर मध्यरात्री खाजगी बस व मोटरसायकल यांच्यात समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात दोन तरुण ठार झाले असून एक जण जखमी झाला आहे. मयत तरुण नटावद ता.नंदुरबार येथील आहेत.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार. सुरत-धुळे रस्त्यावर खाजगी ट्रॅव्हेल्स करणारी बस (क्र.जीजे १४ टी ०९२४) भरधाव वेगाने जात असतांना समोरून येणार्या हिरो फॅशन प्लस मोटरसायकल (क्र.एम.एच.१८ पी ४९४८) ला धडक दिल्याने मोटरसायकलीवर बसलेले दोन युवक जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी झाला. याप्रकरणी खाजगी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नटावद येथील रहिवासी असलेले दीपेश जयेश गावित आणि सचिन राकेश वळवी युवकांना गंभीर इजा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सोबत असलेला अमर राजेश गावित हा जखमी झाला आहे. विसरवाडीचे सहायक पोलिस निरीक्षक पाटील आणि सहकार्यांनी तत्परता दाखवत संबंधित वाहनावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास विसरवाडी पोलीस करत आहेत.