नंदुरबार l प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व 18 वर्षांवरील पात्र नागरिकांचे 100 टक्के लसीकरण करुन घेण्यासाठी सर्व विभागानी नियेाजन करावे. अशा सूचना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिल्यात.
‘कोविड-19’ लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, डॉ. मैनक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे (शहादा), जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती खत्री म्हणाल्या की, कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहिम प्रभावीपणे आणि गतीने राबविणे आवश्यक आहे. त्यानुसार आरोग्य विभागाने नियोजन करावे. आरोग्य विभागाला अन्य सर्व विभागांनी आवश्यक ते सहकार्य करावे. शहरी व ग्रामीण भागातील पहिला व दुसरा डोस घेतलेल्या लाभार्थ्यांच्या अद्यावत याद्या तयार कराव्यात. गाव, वार्डनिहाय सर्वेक्षण करावे. लसीकरण झालेल्या नागरिकांचे डाटा एन्ट्रीचे काम त्वरीत पुर्ण करावेत. ज्या नागरिकांचे लसीकरण झाले आहे परंतू त्यांना लसीकरणाचे प्रमाणपत्र मिळाले नसेल त्याची नोंदणी त्वरीत पूर्ण करावी. लसीकरणाचे प्रमाण कमी असलेल्या तालुक्यात लसीकरण मोहिमेला गती देण्यात यावी. दररोज 10 ते 15 हजार लोकांचे लसीकरण करण्याचे नियेाजन करावे. जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरु झाल्या असून विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या कुटूंबातील 18 वर्षांवरील सर्व पात्र सदस्यांचे लसीकरण करावे त्यासाठी जनजागृती करावी. असे त्यांनी सांगितले.
कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण करण्याबाबत नागरिकांना आवाहन
‘ओमायक्रॉन’ या कोरोनाच्या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी सर्व नागरिकांनी लसीकरण करावे, लग्न, सार्वजनिक ठिकाणी, दुकानांत व रस्त्यावर गर्दी टाळावी, वारवांर हात धुवावे, मास्क वापरावा आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. तसेच जिल्ह्यात लसीकरण 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदविण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी यावेळी केले.
जिल्ह्यात 14 लाख 20 हजार 200 लोकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे उद्दीष्ट.
*9 लाख 13 हजार 834 नागरिकांनी (64.35 टक्के) लसीचा पहिला डोस घेतला आहे.
*4 लाख 69 हजार 627 नागरिकांनी (33.07) लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले आहेत.
*आतापर्यंत पहिला व दुसरा डोस मिळून 13 लाख 83 हजार 461 (97.41) लसीचे डोस देण्यात आले.








