नंदुरबार ! प्रतिनिधी
विसरवाडी ता.नवापूर येथे मालेगाव येथे कत्तलीसाठी अवैधरित्या कोंबून घेऊन जाणाऱ्या गोवंश विसरवाडी पोलीस व गोसेवक यांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आले . यावेळी ११ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . तसेच चार संशयितांना अटक करण्यात आली आहे . ही घटना बुधवारी दि.७ जुलै रोजी सकाळी घडली .
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , नंदुरबार येथील उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांना नंदुरबार येथील गोसेवक डॉ . नरेंद्र पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी माहिती दिली की, नंदुरबारहुन विसरवाडी मार्गे मालेगाव येथील आयशानगर येथे कत्तलीसाठी गोवंश भरलेली मालट्रक जाणार आहे . याबाबत त्यांनी त्वरित विसरवाडी पोलीसांना माहिती दिली , यावरून विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील , हवालदार सुरेश मोरे , अनिल राठोड , भोजराज धनगर , विश्वनाथ नाईक , वाहन चालक राजू कोकणी यांच्या पथकाने पोलिस ठाण्याजवळ बेरॅकेट लावून नाका – बंदी केली . यावेळी वाहनांची तपासणी करीत असताना एक ट्रक ( क्र.एम.एच .४८ जे .१२६४ ) भरधाव वेगाने येताना दिसला . तो ट्रक अडवून चालकास विचारणे केले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली . यावेळी विसरवाडी पोलिसांनी ट्रक ची तपासणी केली असता त्यामध्ये अत्यंत निर्दयपणे नऊ गाई , सहा बैले , सहा वासरे असे एकूण २१ गोवंश पाय तोंड बांधून कोंबण्यात आलेली होती . याप्रकरणी विसरवाडी पोलिसांनी
ट्रक चालक शेख मोबीन शेख उस्मान , सहचालक रिजवान खान इब्राहिम खान , हमाल साजिद अहमद रियाज अहमद , मालक मोहम्मद मुस्ताक इन मोहम्मद रफीक सर्व रा . मालेगाव या चार जणांना अटक केली असून ट्रक मधील एक लाख ६० हजार रुपये किमतीचे गोवंश व दहा लाख रुपये किमतीचा ट्रक असे ११ लाख ६० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे . ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित , अप्पर पोलीस अधीक्षक पवार , उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली . २१ जनावरांना नंदुरबार येथील चौपाळा गोसेवा केंद्रात पाठवण्यात आले आहे . विसरवाडी पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .