नंदुरबार | प्रतिनिधी
जिल्ह्यात शाळा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांना कोरोनाचा धोका होवू नये यासाठी पालकांचे लसीकरणाचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात येणार आहे.तसेच तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी नागरिकांनी घाबरुन न जाता
प्रत्येकाने लसीकरण करने आवश्यक आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी खत्री यांनी केले.
नंदूरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील
रंगावली सभागृहात पत्रकारांशी जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी संवाद साधला यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी त्या म्हणाल्या की, सध्या विदेशात ओमायक्रॉनचा संसर्ग सुुरु झाला आहे. यापार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारकडून उपाययोजना राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. ओमायक्रॉनपासून सुरक्षित राहण्यासाठी लसीकरण गरजेचे आहे. लसीकरण झालेल्या व्यक्तींना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्यास देखील दवाखान्यात जाण्याची गरज पडणार नाही. यामुळे लसीकरण हा एकमेव पर्याय असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच सद्यस्थितीतमध्ये जिल्ह्यात बोट, बार्ज आदी ठिकाणी देखील लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून रोज जवळ पास २० हजारांच्यावर नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे.आतापर्यंत जिल्ह्यात ६५ टक्के लसीकरण झाले असून हे लसीकरण १०० टक्के करायचे आहे.गरज पडल्यास याबाबत कठोर उपाययोजना ही केल्या जातील.तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव टाळायचा असेल तर प्रत्येकाचे लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.जिल्ह्यातील १६०० च्या वर शाळा सुरु झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना कोरोनाचा धोका होवू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांच्या पालकांनी लसीकरण करुन घेतल्याचे प्रमाणपत्र मागविण्यात येणार आहे. यामुळे पालकांनी देखील लसीकरण करणे आवश्यक आहे. येत्या काळामध्ये याबाबत तपासणी करुन पालकांचे लसीकरणाचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी खत्री म्हणाल्या.
मुयावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितले की, नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला लसीकरणाबाबत जिल्ह्याची फारशी समाधानकारक स्थिती नव्हती. मात्र महिन्याभरात जवळपास सव्वातीन लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे यश मिळाले आहे. ग्रामीण भागात रात्री देखील लसीकरण करण्यात आले. यासाठी १४५ केंद्रांवर ३५० पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे लसीकरणाचा टक्का वाढण्यास मदत होत आहे. नागरिकांमध्ये कोरोनाबाबत भिती नसल्याने अनेकजण लसीकरण करुन घेत नाहीत. असे असले तरी कोरोनापासून सुरक्षिततेसाठी लसीकरण करण्याचे आवाहन रघुनाथ गावडे यांनी केले. दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक चारुदत्त शिंदे यांनी लसीकरण केलेल्या व्यक्तींमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळून येत नाही. तसेच त्यांना कोरोनाचा कोणताही त्रास होत नाही. लसीकरण केल्यास मृत्यूदर देखील घटण्यास मदत होते. यामुळे लसीकरण करणे गरजेचे असल्याचे चारुदत्त शिंदे यांनी सांगितले.








