नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील शनिमांडळ हे शनिचे जागृत देवस्थान आहे. शनिआमावस्येनिमित्त याठिकाणी मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. मात्र गेल्या पावणेदोन वर्षांपासून कोरोना प्रादूर्भावामुळे निर्बंध घालण्यात आले होते. सद्यस्थितीत शिथिलता देण्यात आल्याने दि.४ डिसेंबर रोजी शनि आमावस्येच्या दिवशी भाविकांना दर्शन घेता येणार असल्याचे विश्वस्त मंडळाकडून सांगण्यात आले. दरम्यान, कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नियम पाळण्याचे आवाहन देखील मंडळाकडून करण्यात आले आहेे.
नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथे शनि देवाची स्वयंभू मूर्ती प्रकट झाल्याची आख्यायिका आहे. राजा विक्रमादित्य यांना लागलेली साडेसातीचा काळ त्यांनी शनिमांडळ परिसरात व्यतीत केल्याचे आख्यायिकेवरुन कळते. त्याअनुसरून तसे पुरावे देखील या परिसरात मिळून येतात. विक्रमाची साडेसाती संपल्यानंतर शनिमांडळ गावी शनि महाराजांनी राजा विक्रमास प्रत्यक्ष दर्शन देवून शनि साडेसातीतून मुक्त केल्याची कथा आहे. यामुळे शनिमांडळ गावास कलियुगातील साडेसाती मुक्तीचे स्थान म्हणून अनन्य साधारण महत्व आहे. परंतू त्याकाळी भौगोलिकदृष्ट्या विकसित नसल्यामुळे शनिमांडळ हे स्थान प्रसिद्धीच्या झोतापासून उपेक्षित होते. दरम्यान, दळणवळणाच्या साधनांचा झालेला विकास तसेच प्रचार व प्रसार यामुळे शनिमांडळ गाव प्रकाशझोतात येवू लागले आहे. तालुक्याचे विद्यमान आ.डॉ.विजयकुमार गावित तथा तत्कालीन पर्यटनमंत्री आ.जयकुमार रावल यांनी शनिमांडळ गावास तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आणि पर्यटन खात्यातून निधी देखील उपलब्ध करुन दिला. त्यामुळे शनिमंदिर परिसरात भव्यदिव्य वास्तू उभारली जात आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या ठिकाणापासून १८ कि.मी.अंतरावर दक्षिणेस शनिमांडळ गाव आहे. शनिवारी येणारी आमावस्येस शनिदेवाची यात्रा भरते. या यात्रेस गुजरात, मध्यप्रदेश तसेच धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक या ठिकाणाहून भाविक येत असतात. परंतू कोरोना काळामुळे मागील २० महिन्यापासून शनिभक्त हे शनिच्या दर्शनापासून वंचित राहिले आहेत. येणाऱ्या ४ तारखेला शनिआमावस्या असल्याने यावेळेस शनिमांडळ येथे शनिभक्तांचा मेळा भरणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भक्तांनी कोरोनाचे नियम पाळून शनि दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शनैश्वर विश्वस्त मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.








