नंदूरबार l प्रतिनिधी
एस.टी.चे शासनात विलीनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी एस.टी.कर्मचाऱ्यांचा गेल्या २१ दिवसांपासून संप सुरूच आहे.मागणी मान्य होईपर्यत कामावर न जाण्याच्या निर्णयावर एस.टी.कर्मचारी ठाम आहेत तर दुसऱ्या बाजूला मात्र एस.टी.महामंडळाकडून कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात येत आहे.अद्यापपावेता नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील २७१ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आाहे.यात नंदुरबार जिल्ह्यातील सुमारे ८० कर्मचारी आहेत.दरम्यान रविवार व सोमवार अशा दोन दिवसात एस.टी.कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले नसल्याची माहिती धुळे विभागीय नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी दिली.
एस.टी.कर्मचाऱ्यांचा विलीनीकरणासाठीचा लढा सुरूच आहे.शासनाने पगारवाढीचे आश्वासन दिले असले तरी जोपर्यंत एस.टी.शासनात विलीनीकरण होत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्णयावर कर्मचारी ठाम आहेत.तर दुसऱ्या बाजूला मात्र कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात येत आहे.शनिवारी नंदुरबार जिल्ह्यातील चारही आगारांमधून जवळपास ८० कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.असे असले तरी कर्मचारी संपावरुन माघार घेण्यास तयार नाहीत.एस.टी.कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत तोडगा निघत नसल्याने व आता शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांचे हाल होत आहेत.याचा परिणाम शालेय उपस्थितीवर दिसून येत आहे.यामुळे एस.टी.कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत तात्काळ तोडगा काढण्याची मागणी जोर धरत आहे.








