नंदुरबार | प्रतिनिधी

तालुक्यातील नंदुरबार खोक्राळे येथे ट्रॅक्टरने धडक दिल्याने १० वर्षीय बालक ठार तर दोघांना दुखापत झाली असून चालकाविरोधात नंदूरबार तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , नंदुरबार तालुक्यातील खोक्राळे येथील अंकुश रामभाऊ भील , समाधान रामसिंग भील व राज नागेश्वर भील ( वय १० वर्ष ) हे तिघे खोक्राळे गावातील धरणाजवळील रस्त्यावरुन पायी जात होते . यावेळी उदेसिंग रतनसिंग गिरासे रा.तामथरे ता.शिंदखेडा याने त्याच्या ताब्यातील विना नंबरचे ट्रॅक्टर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात ट्रॅक्टर चालवून पायी जाणाऱ्या तिघांना धडक दिल्याने अपघात घडला . घडलेल्या अपघातात राज भील या बालकास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला . तर अंकुश भील व समाधान भील या दोघांना दुखापत झाली . याबाबत कृष्ण बंडू भील यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात उदेसिंग गिरासे याच्याविरोधात भादंवि कलम ३०४ ( अ ) , २७ ९ , ३३७ , ३३८ सह मोटार वाहन कायदा कलम १३४ , १८४ , १८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोहेकॉ . देविदास नाईक करीत आहेत .









