नंदुरबार | प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत नंदुरबार येथील जन शिक्षण संस्थानतर्फे स्वातंत्र्य लढ्यातील बाल शहिदांना अभिवादन करण्यात आले. जन शिक्षण संस्थांनच्या विविध रोजगाराभिमुख उपक्रमात सहभागी असलेल्या महिला लाभार्थीना एकत्रित करून संस्थानतर्फे शहरातील माणिक चौकातील हुतात्मा स्मारकाला भेट देण्यात आली. संस्थेतर्फे कार्यालयापासून जुनी नगरपालिका, शास्त्री मार्केट, माणिक चौकापर्यंत पदयात्रा काढण्यात आली.यावेळी सहभागी महिलांनी दिलेल्या देशभक्तीपर घोषणांनी शहरवासीयांचे लक्ष वेधले होते. संस्थांनच्या पदाधिकार्यांसह उपस्थित
महिलांनी सर्वप्रथम हुतात्मा स्मारक परिसराची स्वच्छता करून पावित्र्य राखले. त्यानंतर अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून शहीद शिरीषकुमार मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी सांगितले की, नंदनगरीच्या हुतात्मा शिरीषकुमार आणि सहकारी बालवीर यांनी महात्मा गांधीजींच्या चले जाव आंदोलनाला प्रतिसाद देत जुलमी ब्रिटिश शासनाला लढा दिला. भारत माता की जय.. वंदे मातरमच्या घोषणा देत तिरंगा ध्वज घेऊन निघालेल्या शाळकरी विद्यार्थ्यांवर इंग्रजांनी बेछूट गोळीबार केला. बाल हुतात्म्यांच्या बलिदानामुळे नंदनगरीचे नाव संपूर्ण देशात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले. या बाल शहिदांच्या स्मरणार्थ माणिक चौकात उभारण्यात आलेल्या पवित्र हुतात्मा स्मारकाला प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकांनी भेट द्यावी.या जनजागर कार्यक्रमात संस्थेचे व्हाईस चेअरमन गिरीष बडगुजर यांनी मार्गदर्शन केले. अभिवादन कार्यक्रमास संस्थेच्या संचालिका कल्पना जाधव, कल्पना पाटील, संचालक बाबूलाल माळी उपस्थित होते.याप्रसंगी संचालक बाबूलाल माळी यांनी भारत अमृत महोत्सव वर्षानिमित्त आगामी वर्षभरात राबविण्यात येणार्या विविध देशभक्तीपर उपक्रमांची माहिती प्रास्ताविकातून दिली. अनुराधा मोरे यांनी स्वच्छता, कोरोना बाबत सतर्कता आणि राष्ट्रभक्तीची उपस्थितांना शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेखाधिकारी शरद जोशी यांनी केले. कोरोना प्रादुर्भावामुळे शासनाने जारी केलेल्या नियमांचे पालन करीत संयोजकांनी जनजागर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. कार्यक्रमाचे संयोजन श्याम चौधरी, फतेसिंग पाडवी, राहुल चव्हाण, कल्पेश जाधव, विनोद पाटील, योगेश पाटील, अंकुश शर्मा, ज्योती सोनार यांनी केले.