राहुल शिवदे
तळोदा l प्रतिनिधी-
धुळे नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदार संघ महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2021 या निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने तळोदा येथील माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक गौरव देवेंद्रलाल वाणी यांच्या उमेदवारी वर शिक्कामोर्तब करण्यात आला असून उद्या दि. 23 नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजेला ते नामांकन दाखल करणार आहेत.
धुळे व नंदुरबार जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या जागेसाठी दि. १० डिसेंबरला मतदान होणार आहे .निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत २३ नोव्हेंबर आहे .अर्ज भरण्याची विद्यमान प्रक्रियाही सुरू झाली . भाजपातर्फे विधान परिषदेच्या जागेसाठी विद्यमान आमदार अमरीश पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे . कॉंग्रेसनेही निवडणूक लढवण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी नंदुरबार व धुळे जिल्ह्यातून काही नावेही कॉंग्रेस निवडणूक समितीने मागविली आहे. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातून जिल्हा कॉंग्रेस चे कार्यध्यक्ष दिलीप नाईक, जिल्हा परिषद सदस्य हेमलता शितोळे, तळोदा येथील माजी उपनगराध्यक्ष व गटनेते गौरव वाणी यांच्या नावाबरोबरच धुळ्याचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांच्या नावाची चर्चा होती.अखेर कॉंग्रेसतर्फे तळोदा येथील माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक गौरव देवेंद्रलाल वाणी यांच्या उमेदवारी वर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आला असून उद्या दि. 23 नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजेला ते नामांकन दाखल करणार आहेत.
महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी धुळे येथील काँग्रेस भवनामध्ये सकाळी दहा वाजता उपस्थित रहावे असे आवाहन नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक व धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष शाम सनेर यांनी केले आहे.








