नवापूर l प्रतिनिधी
जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पावसामुळे नवापुर तालुक्यातील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या खोकसा सह अनेक गावातील शेतकऱ्यांचे भात पिकांसह कापूस व इतर पिके नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. खोकसा गावाचे पोलीस पाटील सुनील गावीत यांच्या शेतात कापणी केलेला भात अवकाळी पावसामुळे पाण्याखाली आल्याने नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार प्रशासनाने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला होता. परंतु काढणीला आलेल्या भात पिकाची कापणी सुरू असतांनाच अवकाळी पावसाने झोडपले आहे. नवापूर तालुक्यात प्रामुख्याने भात पिकाची रोपण शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. सध्या तालुक्यात भात पिकाची काढणी सुरू असतानाच अवकाळी पावसाच्या हजेरीने उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याने महसूल व कृषी विभागाने तत्काळ लक्ष देऊन शेतकर्यांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.