नंदुरबार | प्रतिनिधी
येथील फिटनेस क्लबचे मुख्य संचालक विपुल हेमंतसिंह राजपूत यांनी तेलंगणा येथील नरेश सूर्या क्लासिक एक्सप्रो २०२१ आयोजित राष्ट्रीय बॉडीबिल्डिंग स्पर्धेत कास्य पदक पटकावून आणखी एक यशाचा तुरा रोवला. पुणे श्री अशाच मोठ्या स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त करून विपुल यांनी काही महिन्यापूर्वीच आपला झेंडा रोवला आहे. त्या पाठोपाठ मिळवलेल्या राष्ट्रीय स्पर्धेतील यशामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. स्वतः विपुल राजपूत यांनी याविषयी सविस्तर माहिती देताना सांगितले की , हैदराबाद येथे नरेश सुर्या क्लासिक एक्स प्रो २०२१ २२ ही राष्ट्रीय पातळीवरील बॉडी बिल्डिंग स्पर्धा म्हणजे शरीर सौष्ठव स्पर्धा नुकतीच पार पडली. ८० ते ९० किलो वजनाच्या गटात भाग घेतला होता. यात देशभरातून विविध राज्यातील चारशेहून अधिक स्पर्धक उपस्थित होते. वेगवेगळ्या चाचण्या तपासण्या आणि अंतिम सादरीकरण अशा टप्प्यात तीन दिवस स्पर्धा चालते. यादरम्यान स्पर्धकाचे मसल, फिटनेस, शार्पनेस, डायट कंट्रोल आणि शारीरिक सादरीकरण यांच्या निकषावर आधारित गुण देऊन परीक्षक निवड घोषित करतात. या सर्व स्तरावर ४५० जणांमधून योग्यता सिद्ध करता आली आणि तिसर्या क्रमांकाचे कास्य पदक प्राप्त झाले, असे राजपूत यांनी सांगितले.