नंदुरबार ! प्रतिनिधी
सैताणेहून रनाळे मार्गे नंदुरबारकडे दुचाकीवर गांजा घेऊन जाणाऱ्या दोघांना नंदुरबार तालुका पोलिसांनी अटक केली आहे . दोघांकडून ७० हजारांचा ७ किलो ७०० ग्रॉम गांजा जप्त करण्यात आला आहे .याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, रमेश ताराचंद पाटील , रा . आसाणे व मच्छिंद्र मगन सोनवणे , रा . सैताणे , ता . नंदुरबार असे अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांचे नाव आहे . सैताणेहून रनाळे मार्गे नंदुरबारकडे दोघे विना नंबरच्या मोटारसायकलवर येत होते . रनाळे नजीक वटबारे फाट्याजवळील पेट्रोल पंपाजवळ दोघांना पोलिसांनी अडविले असता त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या . त्यांच्याकडील सामानाची तपासणी केली असता त्यात ७ किलो ७०० ग्रॅम कोरडा गांजा आढळून आला . त्याची बाजारभाव प्रमाणे किंमत ७० हजार रुपये इतकी आहे .
पोलिसांनी दोघांना वाहन व गांजासह ताब्यात घेऊन गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक केली . याबाबत एलसीबीचे हवालदार रवींद्र पाडवी यांनी फिर्याद दिल्याने तालुका पोलिसात रमेश व मच्छिंद्र पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तपास सहायक पोलीस निरीक्षक वाय.एस.चौधरी करीत आहे . दरम्यान , दोन दिवसांपूर्वीच नंदुरबारातील कंजरवाडा भागात ४० हजार रुपये किमतीचा सुका गांजा जप्त करण्यात आला होता .