नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथील २९ वर्षीय युवकाचा खून करून वैंदाणे ते मालपुर रस्त्यावरील विहीरीत फेकल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.याप्रकरणी अज्ञाताविरूध्द नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथील संजय राजेंद्र मोरे ( पाटील ) (२९) या युवकाचा अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणाने खुन केला.तसेच पुरावा नष्ट करण्याचे उद्येशाने संजय राजेंद्र मोर यास एका कापडी चादरीमध्ये नग्न अवस्थेत बांधुन वैंदाणे ते मालपुर डांबरी रस्त्यालगत असलेल्या राखीव वनक्षेत्र कक्ष क्र . ४३७ मधील पुरातन विहरीतील पाण्यात टाकले.त्याचा खून का करण्यात आला हे कारण मात्र गुलदस्त्यात आहे.याप्रकरणी पोना ज्ञानेश्वर सामुद्रे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरूध्द नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात भादवि केलाम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोसई कमलाकर चौधरी करीत आहेत.