तळोदा l प्रतिनिधी
शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांच्या अस्थि कलशासह निघालेल्या शहीद किसान यात्रेला आज तळोदा येथे प्रारंभ झाला.या निमित्ताने काढण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलीत व सभेत जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले.
शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी देशपातळीवर शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे.विविध ठिकाणी झालेल्या या आंदोलनात अनेक शेतकरी शाहिद झालेले आहेत.या साऱ्या शहीदांचे स्मरण व प्रेरणा घेऊन नर्मदा बचाव आंदोलन व किसान संघर्ष समितीच्या वतीने शहीद शेतकऱ्यांच्या अस्थिकलशासह ‘शहीद किसान प्रेरणा यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेला आज तळोदा येथून सुरुवात झाली.
यावेळी नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर,माजी मंत्री तथा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. पद्माकर वळवी,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड. सीमा वळवी,जिल्हा परिषद सदस्य सुहास नाईक,विचारधारा फाऊंडेशनचे तात्याजी पवार,सामाजिक कार्यकर्ते दादाभाई पिंपळे, अनिल कुवर,तळोदा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रोहिदास पाडवी,डॉ. किशोर सामुद्रे,
नर्मदा बचाव आंदोलनाचे लतिका राजपूत, चेतन साळवे,नुराजी वसावे,सियाराम पाडवी,खेमसिंग पावरा,निमा पटले,पुन्या वसावे ,नाथ्या पावरा, नरपत पाडवी ,श्यामजी पाडवी,ओरसिंग पटले प्रा.जयपाल शिंदे, अग्निशिखा शिंदे, भीमसिंग वळवी, प्रकाश ठाकरे,रेवानगर सरपंच हिरालाल पावरा, गणेश बुधावल सरपंच मंगलसिंग पाटील, प्रकाश ठाकरे,योगेश पाडवी,आदींसह काँग्रेस,नर्मदा बचाव व काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शहादा रस्त्यावरील आप संत गुलाम महाराज प्रवेशद्वाराजवळून शहीद किसान प्रेरणा यात्रेच्या निमित्ताने मोटारसायकलची देखील आयोजन करण्यात आले होते.या प्रवेशद्वारापासून बिरसापासून मोटारसायकल रॅली निघाली.या मोटारसायकल रॅलीत शेकडो मोटारसायकलस्वार सहभागी झाले होते. त्यानंतर ही रॅली बिरसा मुंडा चौकात आली.त्याठिकाणी शहीद शेतकऱ्यांच्या अस्थिकलशांना अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी मेधा पाटकर यांनी शहीद किसान प्रेरणा यात्रेची भूमिका स्पष्ट केली.त्या म्हणाल्या की,२६ नोव्हेंबर २०२०पासून दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत हजारो शेतकरी, शेतमजूर, स्त्रीपुरुष देशभरच्या शेतकऱ्यांची जमीन मोठमोठ्या कंपन्यांना बळकवता येईल, कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद पडून खाजगी मंड्यांमध्ये आजच्या इतकाही भाव शेतमालाला मिळणार नाही ल,अशा कायद्याच्या विरुद्ध लढाई सुरूच आहे. याठिकाणी विविध प्रेरणा गीते व घोषणाणी परिसर दणदणून गेला.
यात्रेत दरम्यान स्मारक चौक येथे झालेल्या सभेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमा वळवी यांनी संबोधित केले.शेतकऱ्यांच्या आंदोलनावर हल्ला करून आंदोलन चिरडुन टाकण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत आहे.अनेकदा प्रयत्न करून देखिल आजही आंदोलनाची धग कायम आहे.शेवटच्या श्वासापर्यंत हा शेतकरी हिताचा लढा आपण सुरू ठेवू हीच प्रतिज्ञा व प्रेरणा या यात्रेतून आपण घ्यायला पाहिजे,असे त्या म्हणाल्या.
पद्माकर वळवी यांनी सांगितले की,काँग्रेस पक्ष नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहिला असून शेतकऱ्यांच्या या निर्णायक लढ्यात देखिल सहभागी आहे.केंद्र सरकारच्या हुकूमशाही मोडत काढण्यासाठी शेतकरी सर्वाच्या संघटित लढाची गरज असून शेतकरी आंदोलनाला २६ नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दिल्लीतील आंदोलन जिल्ह्यातील काँग्रेस मोठ्या संख्येने सहभागी होतील,असे देखिल सांगितले.
मेधा पाटकर म्हणाल्या की, एका केंद्रीय मंत्र्यांच्या उर्मट वक्तव्यानंतर त्यांच्याच मुलाने गाड्या घालून शेतकऱ्यांना, सभेनंतर परतत असताना, चिरडणे हे पाशवी कृत्यच नव्हे तर फौजदारी अपराध आहे. आज आशीष मिश्रा हा जेल भोगत असतानाच त्याचे पिता हे केंद्रीय गृहराज्यमंत्रीपदावर आरूढ राहणे हे मोदी शासनाच्या निर्दयतेचेच नव्हे तर लोकशाही विरोधाचे लक्षण आहे. शेतकरीविरोधी पंतप्रधानांनी या हिंसेविरोधात शब्दही न उच्चारता आपली माणुसकी हरवल्याचे दाखवून दिले आहे.
मंत्री अजय मिश्रांनी राजीनामा द्यावा व त्यांना बडतर्फ करावे,यासह किसानविरोधी कायदे रद्द करा, वीजबिल, २०२० रद्द करा ,रेशनव्यवस्था चालू ठेवून अधिक सशक्त करा, वनअधिकार कायदा योग्य प्रकारे व संपूर्ण अंमलात आणा,अकाळी पावसाने झालेल्या या वर्षीच्या नुकसानीची भरपाई द्या,प्रत्येक पिकाला, दुधाला, वनोपज व मासळीलाही योग्य हमीभाव द्या,एकदा तरी संपूर्ण कर्जमुक्ती द्या,या संयुक्त किसान मोर्चाच्या मागण्या असून संपूर्ण कर्जमाफीसाठी कायदे आणण्यासाठी आंदोलन सुरूच राहणार असल्याचे या यात्रेत सांगण्यात आले.
यानंतर ही यात्रा तळोदा तालुक्यातील नर्मदानगर येथे पोहचली.त्याठिकाणी गावकऱ्यांची व प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली व तिथून मोटरसायकल रँली रेवानगरकडे प्रयाण झाली. दरम्यान, आज १३ नोव्हेंबर ला रेवानगरहून १० वाजता गोपाळपूर-मोड-काथरदेदिगर-वाडी पुनर्वसन येथे मुक्काम व १४ नोव्हेंबर ला वाडी पुनर्वसन येथे नर्मदा जीवनशाळा जीवननगर येथे बालदिनाचा कार्यक्रम करून शहादा येथे येणा-या अस्थिकलश यात्रेचे स्वागत करून त्यात संयुक्त किसान मोर्चाच्या समन्वयाने शहादा येथील रँलीत ही सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.