नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील चव्हाण चौकात पुन्हा घरफोडी होऊन ८४ हजार २०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.तीन दिवसात शहरातील ही पाचवी घरफोडी आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,नंदुरबार शहरातील चव्हाण चौक परिसरातील सागर सुरेश चौधरी हे बाहेरगावी गेलेले असतांना चोरट्यांनी कडीकोयंडा कापून आत प्रवेश केला. घरातील ३० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र, अंगठ्या, ओमपान, कानातील दागिने, चांदीचे दागिने, तीन हजाराची रोकड यासह एकूण ८४ हजार २०० रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी सागर चौधरी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार शहरात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.गेल्या तीन दिवसात नंदुरबार शहरातील ही पाचवी घरफोडी आहे.यातील तीन घरफोड्या तर दिवसाला झाल्या आहेत.या चोरीच्या सत्रामुळे पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.








