नंदुरबार l प्रतिनिधी
राज्यातील एसटी कर्मचार्यांनी चार दिवसांपासुन बेमुदत संप पुकारला आहे. या संपाचा फायदा घेत नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील खाजगी वाहतुक व ट्रॅव्हल्स चालक हे प्रवाश्यांकडुन अव्वाच्या सव्वापटीने प्रवासभाडे घेवुन लुट करीत आहेत. उपप्रादेशिक परिवहन विभागाने निश्चित केलेल्या प्रवास दराऐवजी मनमानीपणे प्रवासभाडे आकारीत आहेत. म्हणुन खाजगी ट्रॅव्हल्स चालकांवर योग्य कारवाई करुन प्रवाश्यांची लुट थांबवावी, अशी मागणी नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी व पदाधिकार्यांनी केली आहे.
याबाबत नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बीडकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, गेल्या चार दिवसांपासुन राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी कर्मचार्यांनी पुकारलेल्या संपाची झळ सर्वसामान्य प्रवाश्यांना सोसावी लागत आहे. या संधीच्या फायदा घेऊन नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील खाजगी वाहतुक आणि ट्रॅव्हल्स चालकांकडुन चार ते पाच पटीने प्रवासभाडे जास्तीच्या रक्कम स्वरुपात घेवुन अक्षरशः प्रवाश्यांची आर्थिक लुट सुरु आहे. नंदुरबार ते नाशिक दरम्यानचे प्रवासभाडे प्रतिव्यक्ती तब्बल 1600 रुपये आकारुन कहर केला असुन सदर जास्तीचे प्रवासभाडेचे तिकीट देखील प्रसारीत झाले आहे. आपल्या नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन विभागाकडुन काही दिवसांपुर्वी खाजगी ट्रॅव्हल्सचे प्रवास भाडेदर निश्चित करुन दिले आहे. असे असतांना देखील संबंधित ट्रॅव्हल्स चालक आपण निश्चित केलेल्या प्रवासीभाडे दराव्यक्ती व्यतिरिक्त प्रवाश्यांकडुन अव्वासव्वापटीने जास्तीचे प्रवासभाडे आकारीत आहेत. म्हणुन उपप्रादेशिक परिवहन विभागाने तात्काळ दखल घेऊन प्रवाश्यांची आर्थिक लुट करणार्या खाजगी ट्रॅॅव्हल्स चालकांवर कठोर कारवाई करावी. तसेच खाजगी ट्रॅव्हल्स चालकांवर नियंत्रण ठेवुन योग्य ते प्रवासभाडे आकारण्यात यावे, यातून प्रवाशांना दिलासा मिळेल. म्हणुन आरटीओ विभागाने खाजगी ट्रॅव्हल्स आणि लक्झरी बस यांच्यावर करडी नजर ठेवुन ट्रॅव्हल्स चालकांवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी मनसेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, जिल्हा सचिव पवनकुमार गवळे, नंदुरबार तालुकाध्यक्ष राकेश माळी, नंदुरबार विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुनिल कोकणी, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रविण जोशी, मनविसेचे सैनिक राम ठक्कर, खोंडामळीचे गटअध्यक्ष कल्पेश माळी आदींनी निवेदनातुन केली आहे.








