नवापूर l प्रतिनिधी
येथील पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकामासाठी सुमारे पाच कोटी इतक्या सुधारित अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आ.शिरिषकुमार नाईक यांच्या सततच्या पाठ पुराव्यामुळे निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नवापूर पंचायत समितीची इमारत जूनी झाल्याने नव्याने प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. शासनाने पंचायत समिती इमारत बांधकामासाठी ४ कोटी २७ लाख ७९ हजार इतक्या अंदाजपत्रकीय किंमतीच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली होती. मात्र २०१७-१८ चे प्रचलित दरसूचीनुसार अंदाजपत्रक तयार करण्यात आले असल्याने व सन २०१९-२० ची दर सूची लागु झाल्यामुळे दरांमध्ये वाढ झाल्याने, प्रस्तुत नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम ४ कोटी २७ लाख ७९ हजारात करता येणे शक्य नव्हते. आ.शिरिषकुमार नाईक यांनी नवीन प्रशासकीय इमारत बांधकामासाठी आवश्यक वाढीव ६३ लाख ९३ हजाराची आवश्यकता लक्षात घेता तसा प्रस्ताव तयार केला. नवापूर पंचायत समितीची अद्यावत इमारत तयार व्हावी यासाठी आ. शिरिष कुमार नाईक यांनी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. तसा प्रस्ताव सादर केला, वाढीव निधि साठी सतत पाठपुरावा केला. त्याअनुषंगाने पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकामास सुधारीत अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आ. शिरिषकुमार नाईक यांनी सांगितल्या प्रमाणे प्रस्ताव सादर केला.
शासनाने नवीन प्रशासकीय इमारत बांधकामासाठी आवश्यक वाढीव रक्कम ६३ लाख ९३ हजार मंजुरी देऊन नवीन प्रशासकीय इमारत बांधकामासाठी ४ कोटी ९१लाख ७२ हजार इतक्या अंदाजपत्रकास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
नवापूर पंचायत समितीच्या नविन प्रशासकीय इमारतीचा मार्ग मोकळा झाला आहे. या इमारतीमुळे सर्व प्रशासकीय विभाग एकाच छत्रछायेखाली येतील.