नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात उद्या दि.१२ व १३ नोव्हेंबर २०२१ रोजी शहिद किसान प्रेरणा यात्रा अस्थिकलश घेवून येणार असल्याची माहिती नर्मदा बचाव आंदोलनातर्फे देण्यात आली.
याबाबत नर्मदा बचाव आंदोलनातर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पिकांना योग्य हमीभाव, अकाळी पावसाच्या नुकसानीची भरपाई, वनअधिकारावर अंमलबजावणी व शेतकरीविरोधी कायदे रद्द करावे, यासाठी दि.२६ नोव्हेंबर २०२० पासून दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी, शेतमजूर, स्त्रीपुरुष आंदोलन करत आहेत. देशभरातील शेतकर्यांच्या जमीनी मोठमोठ्या कंपन्यांना बळकवता येईल, कृषी उत्पन्न बाजार समित्याबंद पडून खाजगी मंड्यांमध्ये आजच्या इतकाही भाव शेतमालाला मिळणार नाही असे हे कृषिविरोधी कायदे आहेत. त्याविरुद्ध लढाई सुरू आहे. त्याचप्रमाणे देशभरातील नागरिकांचा आधार, राशन व्यवस्था, संपुष्टात आणणार्या, खाद्यान्नाच्या जमाखोरीची सूट भांडवलशहांना, अदानी, अंबानींना देण्याचा कायदाही मोडीत काढणारच हा संकल्प करण्यात आला आहे. प्रत्येक शेतीमालाला दूध, पहाडी धान्य व वनोपजालाही योग्य हमीभाव देण्यासाठी तसेच संपूर्ण कर्जमाफीसाठी कायदे आणण्यासाठी आंदोलन सुरूच आहे. आज पेट्रोल, डिझेलबरोबरच वीज, खत आदीचे भाव वाढवण्याला व वीजपुरवठ्यातील सबसिडी रद्द करून २०२० चे बिजली विधेयक पुढे नेण्याला विरोध आवश्यक आहे. शेतकर्यांच्याच काय, आज वाढत चाललेल्या शेतमजुरांच्याही आत्महत्या थांबवण्यासाठीच गेल्या वर्षभरात सुमारे ६४० शेतकरी शहीद झाले आहेत. लखिमपूर, खिरी, उत्तरप्रदेश व टिकरी सीमेवरील हत्येस केंद्र सरकार जबाबदार आहे. एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकर्यांना चिरडणे हे पाशवी कृत्य आहे. आशीष मिश्रा हा जेल भोगत असतानाच त्याचे पिता हे केंद्रीय गृहराज्यमंत्रीपदावर आरूढ राहणे लोकशाही विरोधाचे लक्षण आहे. शेतकर्यांच्या संयुक्त किसान मोर्चाने आक्रोश उठवल्यामुळेच शहीदांना भरपाई मिळाली असली तरीही हिंसेला हिंसेने उत्तर देणेसुद्धा मंजूर नाही. जबाबदारी स्वीकारून मंत्री अजय मिश्रांनी राजीनामा द्यावा व त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
टिकरी सीमेवर एकत्रित येणार्या हजारो शेतकरी महिलांवर झालेला ट्रकचा हल्ला हाही अपघात नव्हता. या हत्याकांडाची निष्पक्ष न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. या सार्या शहीदांचे स्मरण व प्रेरणा घेऊनच शहीद किसान प्रेरणा यात्रा ही अस्थिकलशही घेऊन काढण्यात आली आहे. सदर यात्रा नंदुरबार जिल्ह्यात १२ व १३ नोव्हेंबरला येणार आहे.
किसानविरोधी कायदे रद्द करण्यात यावे, वीजबिल २०२० रद्द कराचे, राशनव्यवस्था चालू ठेवून अधिक सशक्त करावी, वनअधिकार कायदा योग्यप्रकारे व संपूर्ण अंमलात आणावा, अवकाळी पावसाने झालेल्या या वर्षीच्या नुकसानीची भरपाई द्यावी, प्रत्येक पिकाला, दुधाला, वनोपज व मासळीलाही योग्य हमीभाव द्यावा, एकदा तरी संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, आदी हक्क मिळवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. सदर अस्थिकलश यात्रेदरम्यान उद्या दि.१२ नोव्हेंबर रोजी तळोदा येथे स्मारक चौकातून १०.३० वाजता मोटरसायकल रॅलीला सुरुवात करण्यात येणार आहे. नर्मदानगर व तेथे कार्यक्रम करून गावकर्यांची व प्रतिनिधींची बैठक होईल व तिथून मोटरसायकल रॅली रेवानगरकडे प्रयाण करणार आहे. १३ नोव्हेंबरला रेवानगरहून १० वाजता गोपाळपूर-मोड-काथरदेदिगर-वाडी पुनर्वसन येथे मुक्काम व दि.१४ नोव्हेंबर ला वाडी पुनर्वसन येथे नर्मदा जीवनशाळा जीवननगर येथे बालदिनाचा कार्यक्रम करून शहादा येथे येणा-या अस्थिकलश यात्रेचे स्वागत करून त्यात संयुक्त किसान मोर्चाच्या समन्वयाने शहादा येथील रॅलीत ही सहभागी होणार आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.