नंदुरबार l प्रतिनिधी
सण, उत्सवाची पार्श्वभूमी लक्षात घेता कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव टाळण्याबरोबरच कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण व शहरी भागात गेले दोन दिवस (2 व 3 नोव्हेंबर) विशेष लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष लसीकरण मोहिमेत जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या दोन्ही दिवशी 65 हजार 306 एवढ्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

2 नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या विशेष लसीकरण शिबिरात पहिल्या दिवशी 31 हजार 698 व्यक्तींनी लसीचा डोस घेवून लसीकरणात सहभाग घेतला. यात 18 ते 44 वयोगटातील 15 हजार 572 व्यक्तींनी पहिला डोस, तर 6 हजार 329 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 6 हजार 81 व्यक्तींनी पहिला, तर 3 हजार 599 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला. 3 आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरा, तर 94 गर्भवती मातांनी पहिला तर 9 गर्भवती मातांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 9 दिव्यांगांनी पहिला डोस तर 2 दिव्यांगांनी दुसरा डोस घेतला आहे.
काल झालेल्या विशेष लसीकरण शिबिरात पहिल्या दिवशी 33 हजार 608 व्यक्तींनी लसीचा डोस घेवून लसीकरणात सहभाग घेतला. यात 18 ते 44 वयोगटातील 16 हजार 312 व्यक्तींनी पहिला डोस, तर 6 हजार 491 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 6 हजार 610 व्यक्तींनी पहिला, तर 3 हजार 983 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला. 4 आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरा, तर 179 गर्भवती मातांनी पहिला तर 21 गर्भवती मातांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 3 दिव्यांगांनी पहिला डोस तर 5 दिव्यांगांनी दुसरा डोस घेतला आहे.
जिल्ह्यातील 14 लाख 78 हजार 999 लोकांना कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट होते. त्यापैकी 7 लाख 73 हजार 454 नागरिकांनी (52.30 टक्के) लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर 3 लाख 67 हजार 129 नागरिकांनी (24.82) दोन्ही डोस घेतले आहेत. आतापर्यंत पहिला व दुसरा डोस मिळून 11 लाख 40 हजार 583 (77.12) टक्के इतके उद्दिष्ट जिल्हयाने पूर्ण केले आहे.
या मोहिमेसाठी आरोग्य विभागाने दोन दिवसासाठी जिल्ह्यात 773 बूथ लसीकरणासाठी कार्यान्वित केले होते. प्रत्येक पथकात एक वैद्यकीय अधिकारी, पारिचारिका,आरोग्य सेवक, आशा सेविका,अंगणवाडी ,मदतनिस कार्यान्वित केले होते. आरोग्य विभाग, महसूल विभाग, पोलिस विभागासह इतर विभाग, लोकप्रतिनिधींसह स्वयंसेवी, सामाजिक संस्थांनी यांची मदत घेण्यात आली. दुर्गम भागात यामोहिमेतंर्गत घरोघरी जावून लसीकरण करण्यात आले.
लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी राज्याचे आदिवासी विकास विभागाचे मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी, जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी लसीकरणासाठी आवाहन केले होते. या आवाहनास नंदुरबार जिल्हातील नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
लसीकरणासाठी दवंडी देणे, गृहभेटी, सार्वजनिक ठिकाणी तसेच समाज माध्यमातून जनजागृती तसेच कोविड नियंत्रणासाठी लसीकरण करणे महत्व नागरिकांना पटवून देण्यात आले. सध्या ग्रामीण भागात खरिपातील पिकांची काढणी व मळणीची कामे सुरू आहेत. त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांच्या सोयीच्या वेळी लसीकरण करण्यात येत आहे. याशिवाय विविध शासकीय विभागांना लसीकरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यामुळे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही लसीकरणासाठी परिश्रम घेतले आहेत.
कोविडचे संसर्ग कमी झाला असला तरी अद्याप कोविड गेलेला नाही, याची जाणीव नागरिकांनी ठेवून ज्या नागरीकांना लसीकरणाचा पहिला डोस घेतला नसेल त्यांनी पहिला तर ज्यांनी पहिला डोस घेतला असेल त्यांनी दुसरा डोस घ्यावा. नागरिकांनी विशेष लसीकरण शिबीरात जसा प्रतिसाद दिला त्याच प्रमाणे प्रत्येक नागरिकांनी जवळच्या लसीकरण केंद्रावर जावून 30 नोव्हेंबर पर्यंत 100 टक्के लसीकरण करण्याचे आवाहन पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांनी केले आहे.









