नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील वावद येथे वास्तव्यास असलेल्या वीररशैव लिंगायात गवळी समाजातील प्रथा व परंपरेनुसार मयत व्यक्तीचे समाधीस्थ अर्थात दफनविधी करण्यात येतो. या अंतिम विधीसाठी वावद ग्रामपंचायतीअंतर्गत गावठाण परिसरातील स्वतंत्र जमीन उपलब्ध होण्याबाबत समाजातर्फे शुक्रवारी प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य वीरर्शैव लिंगायात गवळी समाज बहुउद्देशीय संस्थेच्या नंदुरबार जिल्हा शाखेतर्फे शुक्रवारी वावद येथील गवळी समाज बांधवांतर्फे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आणि तहसीलदार यांना संयुक्त निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की,वावद गावात गेल्या 70 ते 80 वर्षांपासून गवळी समाज वास्तव्यास आहे. अनेक वर्षांपासून गवळी समाजाच्या दिवंगत व्यक्तींच्या अंतिम संस्कारासाठी समाजाच्या नावावर स्वमालकी हक्काची कुठलीही जागा नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. नंदुरबार शहरातील गवळी समाजाचे हक्काची आणि स्वमालकीची स्मशानभूमी धुळे रस्त्यावरील सर्वे नंबर 286 असून त्याप्रमाणे वावद गावात देखील गवळी समाजाच्या स्मशानभूमी साठी स्वतंत्र जागा उपलब्ध होण्यास आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्वच शहरे आणि ग्रामीण भागात देखील गवळी समाजाचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी स्वमालकीची स्मशानभूमी आहे. मात्र वावद गावात अद्याप पर्यंत गवळी समाज स्मशानभूमी नसल्याने गैरसोय निर्माण होत आहे. यावर प्रशासकीय स्तरावर वावद गावातील गवळी समाज बांधवांना स्वमालकीची स्मशानभूमीची जागा उपलब्ध होणेसाठी सहकार्य करावे अशी मागणी करण्यात आली आहे. पंचायत समितीच्या सहाय्यक गट विकास अधिकारी सुवर्णा पवार यांनी निवेदन स्वीकारले. प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल असे सकारात्मक आश्वासन श्रीमती पवार यांनी शिष्टमंडळाला दिले. या निवेदनावर गवळी समाज जिल्हाध्यक्ष गोपाल लगडे, कार्याध्यक्ष महादू हिरणवाळे, संघटक राजेंद्र लगडे, अशोक यादबोले, हेमंत नागापुरे, प्रवीण लगडे, हेमराज लगडे, खंडू गवळी, संतोष गवळी, आदीसह वावद येथील गवळी समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.








