नंदुरबार l प्रतिनिधी
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन जिल्ह्यातील महाविद्यालये सुरू करण्यात आली असून महाविद्यालयातील 18 वर्षावरील सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड-19 चे लसीकरण प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2021 या कालावधीत ‘मिशन युवा स्वास्थ्य’ अभियान राबविण्यात येत आहेत. या मोहिमेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा खत्री यांनी केले आहे.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अठरा वर्षांवरील महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनींनी कोविड-19 च्या लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. अशाच विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याच्या सूचना असल्याने तसेच लसीकरण मोहिमेला गती मिळावी यासाठी या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे.
मोहिमेअंतर्गत महाविद्यालयामध्ये कोविड-19 लसीकरण विशेष शिबीराचे आयोजन केले जात असून यात महाविद्यालयीन 18 वर्षावरील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी ज्यांनी एकही डोस घेतला नसल्यास, त्यांना पहिला डोस तर ज्यांनी पहिला डोस घेतला आहे अशांना दुसरा डोस देण्यात येईल. यासाठी विद्यार्थी महाविद्यालयात जाऊन लस घेऊ शकतात किंवा जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी. लसीकरण मोहिमेमुळे कोविड विषाणूच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी होण्यास मदत होणार असल्याने या मोहिमेत जास्तीत जास्त विद्यार्थांनी लसीकरण करावे. असेही श्रीमती खत्री यांनी कळविले आहे.








